पोलीस कुटुंबीयांनो, घरे रिकामी करा! प्रशासनाच्या नोटिसा, रहिवासी हवालदिल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2019 12:01 AM2019-06-30T00:01:20+5:302019-06-30T00:02:05+5:30
एप्रिल-मे महिन्यांत महापालिकेने इमारत रिकामी करून दुरुस्त करण्यास सांगितले.
ठाणे : वर्तकनगर येथील पोलीस वसाहतीतील म्हाडाच्या इमारत क्रमांक ५१, ५२ आणि ५३ या धोकादायक इमारतींमधील १०८ कुटुंबांना शनिवारी सकाळी ठाणे शहर पोलीस प्रशासनाने ४८ तासांत घरे खाली करण्याची नोटीस धाडली आहे. यावेळी प्रशासनाने पर्यायी व्यवस्था केली नसल्याने ऐन पावसाळ्यात रहिवासी हवालदिल झाले आहेत. नोटिशीनंतर महिलांनी पोलीस प्रशासन विभागाची भेट घेऊन व्यथा मांडल्या. त्यावर घरांतील सामान लगेच बाहेर काढणार नसल्याचे स्पष्ट केले.
एप्रिल-मे महिन्यांत महापालिकेने इमारत रिकामी करून दुरुस्त करण्यास सांगितले. शुक्रवारी सकाळी शहर पोलीस प्रशासनाने तीन इमारतींमधील १०८ कुटुंबीयांना ४८ तासांत घरे खाली करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. त्या परिसरातील आकृती आरएचएस-२ उभारलेल्या इमारतीत पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी या रहिवाशांनी केली आहे.
शहर पोलीस (प्रशासन) अप्पर पोलीस आयुक्त संजय येनपुरे म्हणाले की, वर्तकनगर परिसरातील पोलीस वसाहतीतील इमारती १९७० ते १९७१ साली म्हाडाने उभारल्या आहेत. त्यामुळे आता त्यांचे आयुष्यमान पूर्ण झाले आहे. २०१६-१७ मध्ये स्ट्रक्चरल आॅडिट झाले असून त्या इमारती धोकादायक म्हणून घोषित केल्या आहेत. त्यातच, पाठवलेल्या नोटिसा हा कार्यालयीन भाग आहे. तेथील कुटुंबीयांच्या पर्यायी व्यवस्थेबाबत एमएमआरडीए आणि महापालिकेकडे पत्रव्यवहार करून त्यांच्याकडील संक्रमण शिबिरामार्फत जागा उपलब्ध आहे का, याची विचारणा केली आहे.