जितेंद्र आव्हाडांच्या घरात पोलिसांकडून चित्रीकरण; पत्रकार परिषदेत आव्हाडांचा संताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 12:59 IST2025-01-04T12:59:17+5:302025-01-04T12:59:35+5:30
...ही बाब कार्यकर्त्यांच्या निदर्शनास येताच, त्यांनी त्याला पकडले आणि त्यानंतर आव्हाड यांनी चौकशी करताच, तो ठाणे पोलिसांच्या विशेष शाखेचा कर्मचारी असल्याचे उघड झाले.

जितेंद्र आव्हाडांच्या घरात पोलिसांकडून चित्रीकरण; पत्रकार परिषदेत आव्हाडांचा संताप
ठाणे : शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची शुक्रवारी त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी पत्रकार परिषद सुरू असताना, पत्रकारांच्या गराड्यात शिरून एकजण मोबाइलमध्ये परिषदेसह उपस्थितांचे चित्रीकरण करू लागला. ही बाब कार्यकर्त्यांच्या निदर्शनास येताच, त्यांनी त्याला पकडले आणि त्यानंतर आव्हाड यांनी चौकशी करताच, तो ठाणे पोलिसांच्या विशेष शाखेचा कर्मचारी असल्याचे उघड झाले.
पोलिसांकडून आपल्या घरावर लक्ष ठेवले जात असल्याचा आरोप संतापलेल्या आव्हाडांनी केला आव्हाड यांच्या निवासस्थानी शुक्रवारी पत्रकार परिषद सुरू असताना माध्यमांचे प्रतिनिधी परिषदेचे चित्रीकरण करीत होते. दरम्यान, एका व्यक्तीने मोबाइलमधून पत्रकार परिषदेसह तिथे उपस्थितांच्या चित्रीकरणास सुरुवात केली.
आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांना त्याचा संशय आल्याने त्यांनी त्या व्यक्तीला बाजूला करीत त्यांच्याकडे विचारणा सुरू केली. त्या व्यक्तीने ठाणे पोलिसांच्या विशेष शाखेतील वर्तकनगर विभागाचा कर्मचारी असल्याची माहिती दिली. घरात शिरून चित्रीकरण करण्याची परवानगी कोणी दिली, अशी विचारणा आव्हाड यांनी करताच, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार चित्रीकरण केल्याची कबुली त्याने दिली. जोपर्यंत अशी चित्रीकरणाची सूचना देणारा अधिकारी येत नाही, तोपर्यंत त्या कर्मचाऱ्याला तिथेच थांबवून ठेवण्याची भूमिका आव्हाड यांनी घेतली.
आमच्यावर लक्ष ठेवण्यापेक्षा कराडवर लक्ष ठेवले असते तर, तो आधी पकडला गेला असता. माझ्या घरात चित्रीकरण करणाऱ्या कर्मचाऱ्याला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निलंबित करून हात वर केले असते. त्या कर्मचाऱ्याच्या नोकरीवर गदा येऊ नये म्हणून त्याला सोडून दिले.
- आ. जितेंद्र आव्हाड, ठाणे.
राजकीय पत्रकार परिषद असल्याने या कर्मचाऱ्याने त्या ठिकाणी चित्रीकरण केले. राजकीय घडामाेडी नाेंदविणे, माहिती घेणे या कामासाठी ताे तिकडे गेला हाेता. ताे त्याच्या कामाचा एक भाग हाेता. त्याला तसे करण्यास सांगितले नव्हते.
- पाेलिस अधिकारी, विशेष शाखा, ठाणे.
सरपंच संताेष देशमुख यांची इलेक्शन फंडासाठी हत्या
- बीडचे सरपंच संताेष देशमुख यांची हत्या इलेक्शन फंडासाठी झाल्याचा खळबळजनक आराेप शरद पवार गटाचे आ. जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला.
- ठाण्यातही पर्यावरण तसेच आवश्यक परवानगी मिळण्याआधीच ठाणे खाडी किनारी मार्गाचे कंत्राट कसे दिले, असा प्रश्न उपस्थित करीत निवडणूक निधीसाठी परवानगी आधी प्रकल्पाचे कंत्राट दिल्याचा आरोप आव्हाड यांनी केला.