पोलिसांना ‘ती’ फाइल मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 03:30 AM2018-05-20T03:30:02+5:302018-05-20T03:30:02+5:30
उल्हासनगर महापालिका बांधकाम विभागातून १२ मे रोजी रामचंदानी यांचा फाइलचोरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
उल्हासनगर : महापालिकेतील फाइल चोरीप्रकरणी अटकेत असलेले भाजपा नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने दुसऱ्यांदा २१ मे पर्यंत वाढ केली. पोलिसांनी आठवडाभर केलेल्या चौकशीत नवीन कोणतीच माहिती उघड झाली नाही. केवळ दोनपैकी एकच फाइल हस्तगत करण्यात त्यांना यश आले. त्यामुळे महापालिका अधिकारी व पोलीस संशयाच्या भोवºयात सापडले आहेत.
उल्हासनगर महापालिका बांधकाम विभागातून १२ मे रोजी रामचंदानी यांचा फाइलचोरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. महापालिका आयुक्त गणेश पाटील यांच्या आदेशान्वये शहर अभियंता महेश शीतलानी यांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार दिली. शीतलानी यांनी तक्रारीत दोन फाइल चोरीला गेल्याचे म्हटले होते. मात्र, आठवडाभरातील चौकशीत एकच फाइल हस्तगस्त करण्यात पोलिसांना यश आले. तसेच महापालिका आयुक्त व महापौर फाइलचोरी व गायब झाल्याची माहिती देण्यात अपयशी ठरले.
रामचंदानी यांना फाइलचोरीप्रकरणी अटक झाल्याने मोठे घबाड बाहेर येईल, अशी अपेक्षा होती. मात्र, ती फोल ठरली. फाइलचोरीच्या पार्श्वभूमीवर महापौर मीना आयलानी, आयुक्त गणेश पाटील यांनी विभागप्रमुखांच्या बैठका घेऊन फाइलचोरी व गायब झालेल्या फायलींची संख्या मागितली होती. मात्र, अद्याप ती माहिती त्यांना मिळू शकली नाही. रामचंदानी यांच्या चौकशीतही नवीन काही हाती लागलेले नाही. महापालिका बांधकाम विभागातील अधिकारी, ठेकेदाराचा विरोधी गट तसेच एक राजकीय गट या खेळीमागे असल्याची चर्चा आहे.
महापालिका अधिकारी, पोलीस अपयशी
भाजपा नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांना फाइलचोरीप्रकरणी १२ मे रोजी पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने सुरुवातीला १६ मे पर्यंत पोलीस कोठडी दिली. त्यानंतर, दोन वेळा त्यात वाढ केली आहे. परंतु, एकच फाइल आतापर्यंत मिळाली आहे. महापालिकेनेही किती फायली आतापर्यंत गायब आहेत, याची माहिती पोलिसांना दिली नाही. शहर पोलीस व महापालिका आयुक्त याप्रकरणी अपयशी ठरल्याची टीका सुरू झाली आहे. त्यामुळे ते वादात सापडले आहेत.