दुरुस्तीच्या नावाखाली ठाण्यातील पोलिसांची व्यायामशाळा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 10:28 PM2019-12-19T22:28:00+5:302019-12-19T22:34:15+5:30
ठाणे शहर पोलीस वसाहतीमधील व्यायामशाळेचे साहित्य दुरुस्त करण्याच्या नावाखाली सिद्धी हॉल येथील व्यायामशाळा गेल्या दोन महिन्यांपासून बंद ठेवण्यात आली आहे. ही व्यायामशाळा बंद झाल्याने पोलिसांचीही मोठी गैरसोय झाली आहे. ती तातडीने सुरू करण्याची मागणी पोलीस कर्मचाऱ्यांनी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : येथील मुख्य पोस्ट कार्यालयाजवळ असलेल्या ठाणे शहर पोलीस वसाहतीमधील व्यायामशाळेचे साहित्य दुरुस्त करण्याच्या नावाखाली सिद्धी हॉल येथील व्यायामशाळा गेल्या दोन महिन्यांपासून बंद ठेवण्यात आली आहे. पोलीस आणि त्यांच्या पाल्यांचे आरोग्य तंदुरुस्त राहावे, या उद्देशाने सुरू झालेली ही व्यायामशाळा बंद झाल्याने पोलिसांचीही मोठी गैरसोय झाली आहे. ती तातडीने सुरू करण्याची मागणी पोलीस कर्मचाऱ्यांनी केली आहे.
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये पोलीस कल्याण निधीतून २००० मध्ये ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहासमोरील सिद्धी हॉल येथे ही अत्याधुनिक व्यायामशाळा सुरू केली आहे. याठिकाणी व्यायामासाठी अनेक साधनसामग्री ठेवण्यात आली आहे. तिच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी दोन पोलीस अंमलदार कार्यरत आहेत. याचा फायदा पोलिसांना चांगल्या प्रकारे होत होता. याठिकाणचे काही साहित्य जुने झाल्याने ते नादुरुस्त आहेत. ते दुरुस्त करण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी व्यायामशाळा बंद ठेवली होती. या साहित्याची दुरुस्ती होऊन ती लवकरच सुरू होईल, अशी अपेक्षा पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या पाल्यांकडून व्यक्त होत होती. मात्र, ६० दिवस उलटूनही ती सुरू न झाल्याने पोलीस कर्मचाºयांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
पोलीस कल्याण निधीतून सुरू झालेल्या या व्यायामशाळेच्या दुरुस्तीचे कामही याच निधीतून करता येईल. मात्र, ती अद्याप सुरू झालेली नाही. पोलीस आयुक्तालयाच्या प्रशासन विभागातील अधिकाºयांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी येथील पोलीस कर्मचा-यांनी केली आहे.