बिबट्याच्या कातडीसह दोघांना केले गजाआड; दहा लाखांची किंमत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 01:36 AM2019-12-12T01:36:38+5:302019-12-12T01:37:18+5:30
दोन्ही आरोपी दादरा नगर हवेलीचे राहणारे आहेत.
भाईंदर : भाईंदर पूर्व भागात बिबट्याची कातडी घेऊन आलेल्या दोघा जणांना नवघर पोलिसांनी मंगळवारी रात्री अटक केली. त्यांच्याकडून कातडी ताब्यात घेतली असून, बाजारात त्याची किंमत सुमारे १० लाख रुपये आहे. दोन्ही आरोपी दादरा नगर हवेलीचे राहणारे आहेत.
नवघर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी, कर्मचारी मंगळवारी गस्त घालत असताना भाईंदर पूर्वेच्या स्वातंत्र्यवीर सावरकर चौकाजवळ (गोल्डन नेस्ट) दोन इसम हे संरक्षित वन्य प्राणी असलेल्या बिबट्याची कातडी विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संपतराव पाटील, उपनिरीक्षक प्रमोद पाटील यांच्यासह संजय पाटील, रविंद्र भालेराव, वाघ, माने, गिरगावकर, ठाकूर आदींच्या पथकाने सावरकर चौक ते इंद्रलोककडे जाणाऱ्या मार्गावर सापळा रचला. त्यावेळी दोन संशयित इसम तिथे आले असता त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याजवळील बॅगची तपासणी केली असता बिबट्याचे कातडे आढळून आले.
पोलिसांनी याप्रकरणी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करुन कातडी खरी असल्याची खात्री केली. या प्रकरणी दादरा नगर हवेलीच्या सिलवासा येथून सदर कातडी घेऊन आलेल्या अंकित जयेश थोरात (२४) रा. पटेलपाडा, मोरखल आणि रवींद्र वसंत पटेल (२५) रा. सायली, सालकापडा या दोघांना वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. हे दोघेही सिलवासा भागात नोकरी करणारे आहेत. जास्त पैसे मिळतील म्हणून एकाने कातडी विक्रीचे काम सांगितल्याने ते दोघे येथे आले होते. ही कातडी कोणी दिली आणि ते कोणाला विकणार होते, याची चौकशी सुरु आहे. सहाय्यक उपनिरीक्षक बाळू राठोड पुढील तपास करत आहेत.