ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यास पोलिसांच्या प्रसंगावधनामुळे मिळाले जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2019 09:28 PM2019-12-03T21:28:57+5:302019-12-03T21:36:33+5:30
कळवा पुलावरून मद्याच्या नशेत स्वत:ला फाशी घेऊन उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न करणा-या धनाजी भगवान कांबळे (४५, रा. कळवा, ठाणे ) याचे कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे आणि वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस हवालदार जयंत पवार यांनी काही नागरिकांच्या मदतीने हायड्रोलिक के्रनच्या सहाय्याने प्राण वाचविल्याची घटना मंगळवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : तिस-या कळवा पुलावरून मद्याच्या नशेत स्वत:ला फाशी घेऊन उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न करणा-या धनाजी भगवान कांबळे (४५, रा. कळवा, ठाणे ) याचे कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे आणि वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस हवालदार जयंत पवार यांनी काही नागरिकांच्या मदतीने हायड्रोलिक के्रनच्या सहाय्याने प्राण वाचविल्याची घटना मंगळवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. २३ वर्षीय मुलाचा अकाली मृत्यू आणि आर्थिक विवंचनेतून त्याने हे पाऊल उचलल्याचे पोलिसांना सांगितले.
कळवा येथील बांधकाम सुरू असलेल्या तिसºया पुलावर कांबळे हा सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास अचानक चढला. तो पुलावर उभा असतांनाच त्याला अनेकांनी खालून आवाज देत रोखले. तोपर्यंत त्याने गयात दोर बांधून काही मिनिटांनी उडीही घेतली. पण ती घेतली त्यावेळी त्याने गळ्याभोवतीच्या दोराला घट्ट पकडल्यामुळे त्याचा जीव वाचला. योगायोगाने पोलीस उपायुक्तांकडे एका बैठकीसाठी कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे हे तिथून जात होते. त्यांनी तत्काळ तिथून जाणा-या एका हायड्रोलिक क्रेनची मदत घेतली. त्यावर काही नागरिकांना चढण्यास सांगून वर लटकलेल्या अवस्थेमध्ये असलेल्या कांबळेचा जीव वाचविण्यासाठी प्रयत्न केले. त्याचवेळी कळवा वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस हवालदार जयवंत पवार, पोलीस हवालदार जंगम आणि उबाळे यांनीही तिथे धाव घेऊन या मदत कार्यामध्ये मोलाची मदत केली. भरदिवसा घडलेल्या या थरारनाट्यामुळे याठिकाणी वाचविणाऱ्यांपेक्षा बघ्यांची आणि हा आत्महत्येचा प्रयत्न होत असलेला प्रकार कॅमेºयामध्ये टिपण्यासाठीही एकच झुंबड उडाली होती. अखेर अर्ध्या तासाच्या मोठया प्रयत्नांनंतर वर लटकलेल्या कांबळे याच्या गळ्यातील फास काढून त्याला सुखरुपपणे खाली आणण्यात पोलिसांना यश आले. दरम्यान, कांबळे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून पुन्हा घरी सोडण्यात आले.
पाच हजारांचे बक्षिस
घटनास्थळी तातडीने धाव घेऊन कांबळे यांचा जीव वाचविण्यासाठी पुढे सरसावणारे पोलीस हवालदार पवार आणि उबाळे यांचे पोलीस वर्तुळातून कौतुक होत असून त्यांना पोलीस आयुक्तांचे पाच हजारांचे रोख पारितोषिकही दिले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मुलाच्या मृत्यूमुळे नैराश्य
कांबळे याला तीन मुले होती. त्यातील २३ वर्षीय मुलाचा तीन महिन्यांपूर्वीच रेल्वे अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. तर उर्वरित १९ आणि २१ वर्षीय ही दोन मुलेही बेरोजगार आहेत. त्यात ५० हजारांचे कर्जही झालेले आहे. आर्थिक विवंचनेत असतांनाच तो व्यसनाच्याही आहारी गेला आहे. त्याची सुटका केली त्यावेळीही तो दारूच्या नशेतच होता, असेही कळवा पोलिसांनी सांगितले. अर्थात, त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी विचारात घेऊन त्याच्याविरुद्ध कोणताही गुन्हा दाखल करण्याऐवजी त्याचे समुपदेशन करून त्याला सोडणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी सांगितले.