सराफाच्या हत्येचे आरोपी २४ तासात शोधणारे पोलीस निरीक्षक अहिरराव केंद्रीय पदकाने सन्मानित
By धीरज परब | Published: August 13, 2022 05:18 PM2022-08-13T17:18:11+5:302022-08-13T17:18:49+5:30
Police News: मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या मनुष्य वध तपास पथकाचे पोलीस निरीक्षक समीर अहिरराव यांना सराफाची हत्या करणाऱ्या आरोपीना २४ तासात पकडून उत्कृष्ट तपासा बद्दल केंद्र सरकारच्या गृह विभागाने केंद्रीय गृहमंत्री पदक मंजूर करून सन्मानित केले आहे.
-धीरज परब
मीरारोड - मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या मनुष्य वध तपास पथकाचे पोलीस निरीक्षक समीर अहिरराव यांना सराफाची हत्या करणाऱ्या आरोपीना २४ तासात पकडून उत्कृष्ट तपासा बद्दल केंद्र सरकारच्या गृह विभागाने केंद्रीय गृहमंत्री पदक मंजूर करून सन्मानित केले आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाकडून क्लिष्ट, थरारक व बहुचर्चित संवेदनशील गुन्हयांच्या उत्कृष्ट तपासाकरिता ‘केंद्रीय गृहमंत्री पदक' प्रदान करण्यात येत असते. केंद्रीय मंत्रालयाकडून महाराष्ट्रातील एकुण ११ पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सदरचे पदक प्रदान करण्यात येत असते. यंदा सदर केंद्रीय पदकाचा बहुमान मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयातील दोघा अधिकाऱ्यांना मिळाला आहे . नयानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी व गुन्हे शाखेतील मनुष्यवध तपास पथकाचे पोलीस निरीक्षक समीर अहीरराव यांना यावर्षीचे 'केंद्रीय गृहमंत्री पदक' मंजुर करण्यात आले आहे.
२१ ऑगस्ट २०२१ रोजी नालासोपारा पोलीस ठाणे हद्दीतील एसटी डेपो मार्गावर असलेल्या चंद्रेश पॅलेस मधील साक्षी ज्वेलर्स चे मालक किशोर जैन यांची हत्या करण्यात आली होती . आरोपींनी त्यांचे दोन्ही हात सेलोटेपने बांधून त्यांच्या डोक्यावर व शरीरावर तिक्ष्ण हत्याराने वार करुन जिवे ठार मारुन दुकानातील सोन्या-चांदीचे दागिने लुटून नेले होते.
गुन्हयातील अज्ञात आरोपीतांनी स्वतःची ओळख लपविण्याच्या दृष्टीने सर्व खबरदारी घेवून सदरचा गंभीर स्वरुपाचा गुन्हा केला होता. सदरचा क्लीष्ट व संवेदनशील गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने पोलीस ठाणे व गुन्हे शाखेतील अधिकारी - अंमलदार यांनी अज्ञात आरोपींचा शोध चालवला होता . तयावेळी नालासोपारा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले समीर अहीरराव पोलीस पथकासह अज्ञात आरोपीतांची ओळख निष्पन्न करुन गुन्हे शाखेतील अधिकारी व अंमलदार यांच्या मदतीने दोन्ही आरोपीना २४ तासाच्या आत अटक केली होती. एका आरोपीला मुंबईच्या ताडदेव तर दुसऱ्याला भाईंदर मधून पकडण्यात आले होते . त्यातील एक आरोपी पोल्स रेकॉर्ड वरचा होता . अहिरराव यांनी सदर गुन्हयाचा योग्य रित्या तपास करुन न्यायालयामध्ये मुदतीत दोषारोपपत्र सादर केले होते.