महापालिकेच्या कर्तव्यकसुर सहा.आयुक्तांसह बीट निरिक्षकांवर पोलीसांत गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 10:34 PM2018-03-05T22:34:39+5:302018-03-05T22:34:39+5:30
भिवंडी : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरातील अनाधिकृत बांधकामावर तोडू कारवाई करण्याची टाळाटाळ व कर्तव्यकसुर केल्याने पालिकेचे विधी अधिका-यांनी सहा.आयुक्तांसह बीट निरीक्षकावर निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईने यामुळे पालिका अधिकारी व कर्मचा-यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
शहरात बेसुमार वाढलेल्या अनाधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी पालिका प्रशासनाने कठोर करवाईचा बडगा उगारला आहे. दरम्यान उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शहरातील सुमारे २५९ अनाधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश पालिका आयुक्तांना दिले आहेत.त्यानुसार आयुक्त योगेश म्हसे यांनी पदनिर्देश अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त सुनील भालेराव आणि बीट निरीक्षक भरत उघडे यांना अशा प्रकारची अनाधिकृत बांधकामे पाडण्याचे आदेश दिले होते. मात्र या कर्मचा-यांनी ४ डिसेंबर २०१५ ते २६ फेब्रुवारी २०१८ पर्यंत आपापसात संगनमत करून तोडू कारवाई करण्यास टाळाटाळ केली आणि अनाधिकृत बांधकामांस अभय दिले. असा ठपका ठेवीत विधी अधिकारी अनिल प्रधान यांनी सहा.आयुक्त सुनिल भालेराव व बीट निरिक्षक भरत उघडे यांच्या विरोधात निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. विधी अधिका-या मार्फत ही कारवाई झाल्याने अनाधिकृत बांधकामावर कारवाई करण्याची टाळाटाळ करणा-या कर्मचा-यांना व बेकायदेशीर बांधकामांना अभय देणा-या अधिका-यांना यापुढे चांगलेच भोवणार असल्याने त्यांचे धाबे दणाणले आहेत.