पोलीस निरीक्षक संजू जॉन यांची ‘एसीबी’त बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:45 AM2021-08-21T04:45:39+5:302021-08-21T04:45:39+5:30
कल्याण : कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांची मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) मुख्यालयात ...
कल्याण : कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांची मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) मुख्यालयात बदली झाली आहे. तसेच अन्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्याही बदल्या झाल्या असून, गुन्हे अन्वेषण विभागाची जबाबदारी आता कोणावर सोपविली जाते? याकडे लक्ष लागले आहे.
जॉन यांनी चार वर्षे गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली. कल्याण गुन्हे अन्वेषण विभागात सर्वाधिक काळ कार्यरत राहिलेले ते एकमेव अधिकारी आहेत. कल्याण परिमंडळ ३ च्या हद्दीत घडणारे खून, दरोडे, वाहनचोरी, घरफोड्या, सोनसाखळी चोरी आदी गुन्ह्यांतील आरोपींचा छडा लावण्यात जॉन यांच्या मार्गदर्शनाखालील पथकांनी विशेष कामगिरी बजावली. कल्याण-डोंबिवलीतील बरेचसे गंभीर गुन्हे २४ तासांत त्यांनी उघडकीस आणले. या त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना १ मे रोजी पोलीस दलात केलेल्या गुणवत्ता सेवा आणि उत्कृष्ट कामगिरीबाबत सन्मानचिन्ह देऊन पोलीस महासंचालकांच्या वतीने सन्मानित करण्यात आले होते.
जॉन यांच्यासह गुन्हे अन्वेषण विभागातील पोलीस उपनिरीक्षक सचिन मुदगुन, शरद पंजे आणि अन्य सहा पोलीस कर्मचाऱ्यांचीही अन्य ठिकाणी बदल्या झाल्या आहेत. जॉन यांची बदली झाल्याने गुन्हे अन्वेषण विभागाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदाचा कार्यभार सध्या पोलीस निरीक्षक विलास पाटील यांच्याकडे प्रभारी म्हणून सोपविण्यात आला आहे.
-------------------