अनधिकृत बांधकामांमध्ये पोलिसांचा हस्तक्षेप
By admin | Published: October 5, 2016 02:19 AM2016-10-05T02:19:52+5:302016-10-05T02:19:52+5:30
अनधिकृत बांधकामांविरोधातील वाढत्या तक्रारींमध्ये पोलिसांचा हस्तक्षेप वाढतो आहे. बेकायदा बांधकामे करतांना बिल्डर बनावट कागदपत्रे तयार करीत असल्याचा फायदा
शशी करपे , वसई
अनधिकृत बांधकामांविरोधातील वाढत्या तक्रारींमध्ये पोलिसांचा हस्तक्षेप वाढतो आहे. बेकायदा बांधकामे करतांना बिल्डर बनावट कागदपत्रे तयार करीत असल्याचा फायदा घेऊन पोलिसांकडून कारवाईच्या नावाखाली बिल्डरांनाच अभय देण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यातूनच एका तक्रारदाराने पोलिसांनी आपल्याला धमकी दिल्याची तक्रार केल्याने पोलीस वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
वसई विरार परिसरात सध्या बनावट कागदपत्रे तयार करून बेकायदा इमारती बांधल्याची शेकडो प्रकरणे उजेडात आली असून विविध पोलीस ठाण्यांमध्ये दोनशेहून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. तर आतापर्यंत तितकेच बिल्डर जेलमध्ये गेले आहेत. बनावट कागदपत्रांमध्ये जामीन मिळत नसल्याने बिल्डर धास्तावले आहेत. त्यामुळे आता बिल्डरांनी पोलिसांशी संधान साधून स्वत:ला सेफ करण्यास सुरुवात केली आहे.
त्यातूनच तक्रारदाराची तक्रार दाखल करून न घेणे, तक्रार मागे घेण्यासाठी दबाब टाकणे, बिल्डरांना झुकते माप देण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेकडे आता संशयाने पाहिले जात आहे.
एका जाधवने दुसऱ्या जाधवला पाठीशी घातले?
जाधव याप्रकरणी फरार होते. त्यांना शोधण्यासाठी पोलीसांनी महापालिकेच्या आयुक्तांना सहकार्य करण्याची विनंती केली होती. तरीही अटकपूर्व जामीन घेण्यासाठी उच्च न्यायालयात हजर राहिलेल्या अरुण जाधव यांची पोलीस कस्टडी घेणे तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरिक्षक सुनिल एस.जाधव यांना आवश्यक वाटले नाही. त्यामुळे अर्थपूर्ण संबंधातून एका जाधवने दुसऱ्या जाधवला पाठीशी घातल्याची तक्रार काकडे यांनी केला आहे.
दरम्यान, याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची तयारी काकडे यांनी सुरु केली आहे. त्यामुळे हे प्रकरण मिटवण्याची कामगिरी अरुण जाधव यांनी दोन पोलीसांकडे सोपवल्याची तक्रार काकडे यांनी पोलीस अधिक्षक शारदा राऊत यांच्याकडे केली आहे. राजेश महाजन आणि शाम शिंंदे अशा या पोलीसांनी अरुण जाधव यांच्याविरोधात दाखल केलेल्या तक्रारी मागे घे. त्यासाठी तुला पैसे देतो. नाहीतर खोट्या गुन्ह्यात अडकवून टाकू अशी धमकी दिल्याची तक्रार काकडे यांनी पोलीस अधीक्षका शारदा राऊत यांच्याकडे केली आहे.