धक्कादायक ! ठाण्यात ११६ जणांना दिली बोगस लस
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2021 05:07 AM2021-06-30T05:07:19+5:302021-06-30T05:07:30+5:30
पोलीस तपासात उघड झाली बाब
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : मुंबईत ज्या पद्धतीने बोगस लसीकरणाचे प्रकरण समोर आले होते. त्यानंतर अटकेत असलेल्या त्याच आरोपींनी ठाण्यातही तशाच पद्धतीने बोगस लसीकरण केले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. त्यानुसार या संदर्भात नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर या प्रकरणाचा अधिक तपास केला असता तब्बल ११६ नागरिकांचे बोगस लसीकरण केल्याची माहिती समोर आली आहे. या लसीकरणातून १ लाख १६ हजारांची फसवणूक करुन चार जणांना बोगस सर्टिफिकेटही दिल्याची माहिती समोर आली आहे.
नौपाडा पोलीस ठाण्याचे हद्दीत २६ मे २०२१ रोजी सकाळी १० ते दुपारी १ वाजताच्या सुमारास रेन्युबाय डॉट कॉम, ऑफीस नं. २२, दुसरा माळा, श्रीजी आर्केड, नितीन कंपनी जवळ आरोपी महेंद्र सिंग व त्याचे सहकारी श्रीकांत माने, संजय गुप्ता, सीमा अहुजा व करीम यांनी कोरोना आजाराचे अनुषंगाने कोविशिल्ड या व्हॅक्सिनचे लसीकरण आयोजित करून भेसळयुक्त औषधी द्रव्य असलेली बोगस लस रेन्युबाय डॉट कॉममधील स्टाफ व त्यांच्या कुटुंबीयांना देऊन प्रत्येक लसीमागे एक हजार रुपये याप्रमाणे तब्बल एक लाख १६ हजार रुपये वसूल केले. तसेच त्यातील चौघांना कोविशिल्ड घेतल्याचे बनावट सर्टिफिकेट दिल्याची माहितीदेखील समोर आली होती. त्यानंतर आता यात ११६ जणांना बोगस लस देण्यात आल्याची माहिती तपासात समोर आली आहे.