पोलीस-मनसैनिकांची ठाण्यात धक्काबुक्की
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 11:41 PM2020-11-26T23:41:43+5:302020-11-26T23:41:59+5:30
विनापरवानगी मोर्चा : वाढीव वीजबिलांवरुन सरकारवर केली टीका
ठाणे : पोलिसांची परवानगी नसतानाही वाढीव वीजबिलांविरोधात मनसेने रस्त्यावर उतरून बॅरिकेट्स तोडून मोर्चाला सुरुवात केली. यावेळी मनसैनिक आणि पोलीस यांच्यात धक्काबुक्की आणि बाचाबाची झाली. बॅरिकेट्स तोडून थोड्या अंतरावर गेल्यावर मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. यावेळी मनसेने पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधत उद्धव ठाकरे हाय हायच्या घोषणा दिल्या.
नागरिकांना आलेल्या भरमसाट वीजबिलांविरोधात गुरुवारी दुपारी १ वाजता मनसेने कॅडबरी जंक्शन ते जिल्हाधिकारी असा मोर्चा आयोजित केला होता. परंतु, पक्ष कार्यालयाजवळ पोलिसांचा कडक बंदोबस्त होता. पोलिसांनी रस्तेही बंद केले होते. पक्षाचे झेंडे घेऊन विष्णूनगर येथील पक्ष कार्यालयाजवळ शेकडोच्या संख्येने मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जमले होते. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मुख्य ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त होता. बुधवारी रात्रीच पोलिसांनी मनसे पदाधिकाऱ्यांना मोर्चासाठी परवानगी नाकारली होती. परवानगी नसतानाही सकाळी सर्व मनसैनिक जमले होते. दुपारी १२.३० च्या सुमारास मोर्चाला सुरुवात होताच पोलिसांनी त्यांना अडविण्यास सुरुवात केली. परंतु, बॅरिकेट्स तोडून मनसैनिक बाहेर पडले आणि राज्य सरकार आणि उद्धव ठाकरेंचा निषेध करीत घोषणाबाजी सुरू केली. विष्णूनगरच्या टोकाला पोलिसांनी अडवून मनसे नेते अभिजित पानसे, ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, शहराध्यक्ष रवींद्र मोरे, कोपरी-पाचपाखाडी विभागाध्यक्ष महेश कदम, मनविसे ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे, समीक्षा मार्कंडे यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. या मोर्चात महिला कार्यकर्त्याही सहभागी झाल्या होत्या. यावेळी मनसैनिकांनी कोरोनाविषयक नियम पायदळी तुडवले. मास्कचा वापर किंवा सोशल डिस्टन्सिंगही पाळले नाही.
मनसेचा मोर्चा अडवताना पोलिसांची चांगलीच दमछाक झाली.
सर्वसामान्यांची वीजबिले रद्द व्हावी म्हणून हा मोर्चा काढण्यात आला होता. सरकारची ही दडपशाही आहे. मनसे अशा दडपशाहीला जुमानणार नाही. आज लोकशाहीने मोर्चा काढला, उद्या मनसे स्टाइलने काढू.
- अभिजित पानसे
आज पुन्हा एकदा आम्हाला दडपण्याचा प्रयत्न केला. लोकांना ५० हजार रुपये बिले आली, तरी सरकार निर्णय घेत नाही. काँग्रेसला श्रेय नको म्हणून वीजबिलवाढीविरोधात शिवसेना निर्णय घेत नाही. उद्धव ठाकरेंचा आम्ही निषेध करतो.
- अविनाश जाधव