पोलिसांचे मनोबल वाढवणारा सोहळा

By Admin | Published: April 1, 2017 11:35 PM2017-04-01T23:35:45+5:302017-04-01T23:35:45+5:30

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अहोरात्र पहारा देणाऱ्या पोलिसांचे मनोबल उंचावणारा एक रगंतदार सोहळा शुक्रवारी वाशीत संपन्न झाला.

Police mental morale | पोलिसांचे मनोबल वाढवणारा सोहळा

पोलिसांचे मनोबल वाढवणारा सोहळा

Next

नवी मुंबई : कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अहोरात्र पहारा देणाऱ्या पोलिसांचे मनोबल उंचावणारा एक रगंतदार सोहळा शुक्रवारी वाशीत संपन्न झाला. ‘लोकमत’च्या वतीने नवी मुंबईतील कर्तृत्वान पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या उत्कृष्ट सेवेसाठी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या सोहळ्याला पोलिसांनी सहपरिवार उपस्थिती लावली. त्यामुळे वातावरणात वेगळाच उत्साह दिसून आला.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाची लोकसंख्या २५ लाखांच्या घरात आहे. २0 पोलीसठाण्यांच्या माध्यमातून या संपूर्ण परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम केले जाते. अपुरे मनुष्यबळ असतानाही दिवस-रात्र पहारा देऊन नागरिकांच्या सुरक्षिततेचे व्रत जोपासले जात आहे. प्रतिकूल परिस्थितीतही अव्वल दर्जाची कामगिरी करणाऱ्या या जिगरबाज पोलिसांच्या असमान्य कर्तृत्वाची दखल ‘लोकमत’ने घेतली. त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारून त्यांचे मनोबल उंचावण्याच्या दृष्टीने केवळ सामाजिक बांधिलकीतून ‘लोकमत आउटस्टँडिंग अ‍ॅवार्ड’चे शुक्रवारी वाशी येथे वितरण करण्यात आले. गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, महापौर सुधाकर नाईक, बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे, नवी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, निवृत्त पोलीस महासंचालक अरविंद इनामदार, निवृत्त अप्पर पोलीस महासंचालक रामराव वाघ, ‘लोकमत’चे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर, सह उपाध्यक्ष विजय शुक्ला, सह उपाध्यक्ष आर. बालाचंदर व डी.वाय. पाटीलचे स्पोटर््स अकॅडमीचे अध्यक्ष विजय पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कर्तृत्वान पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी २८ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तर उल्लेखनीय सेवा बजावणाऱ्या पोलिसांच्या पाच गटांनाही या वेळी सन्मानित करण्यात आले. सन्मानप्राप्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव उमटले होते. विशेषत: त्यांच्या कुटुंबीयांचा उत्साह पाहण्यासारखा होता. दोन-दोन दिवस कामानिमित्त घराबाहेर असणाऱ्या आपल्या वडिलांचा सन्मान होताना पाहून लहान मुलांच्या चेहऱ्यांवर वेगळा आनंद पाहवयास मिळाला. प्रत्येक सन्मानाच्या वेळी हॉलमध्ये होणारा टाळ्यांचा कडकडाट हे या पुरस्काराचे महत्त्व अधोरेखित करणारे ठरले.
वाशी येथील रघुलीला आर्केडच्या इम्पेरियल हॉलमध्ये संपन्न झालेला या सोहळ्याचे नियोजन व संयोजन अत्यंत नेत्रदीपक होते. विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती, हे या कार्यक्रमाचे वेगळे वैशिष्ट्य ठरले. कार्यक्रमात चिंतामणी सोहनी व पल्लवी केळकर यांनी सादर केलेल्या हिंदी-मराठी गीतांना उपस्थितांनी दाद दिली. तर हास्यप्रबोधनकार संजीव म्हात्रे यांनी आपल्या खास शैलीतून सभागृहात हास्य पिकविले. उत्तरा मोने यांच्या शैलीदार सूत्रसंचालनाने कार्यक्रमात रंग भरला. ‘लोकमत’च्या मुंबई आवृत्तीचे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर यांनी प्रास्ताविक केले. तर ‘लोकमत’चे सह उपाध्यक्ष विजय शुक्ला यांनी पुरस्काराची रूपरेषा विशद केली. (प्रतिनिधी)


कर्तृत्वान पोलिसांचा सन्मान करून ‘लोकमत’ने एक आदर्श ठेवला आहे. खरे तर अविश्रांत सेवा बजावणाऱ्या पोलिसांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्यासाठी ‘लोकमत’ने उचललेले हे वामन पाऊल आहे. त्यामुळे पोलिसांना काम करायला नक्कीच बळ मिळेल, असा विश्वास निवृत्त पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांनी व्यक्त केला. आयपीएस अधिकाऱ्यांना २५ वर्षांत चार वेळा बढती मिळते. त्यामुळे पोलीस हवालदारांना किमान दोन वेळा तरी बढती मिळायला हवी, अशी मागणी त्यांनी केली. पोलिसांनी प्रामाणिकपणा व चांगुलपणाची लस स्वत:च टोचून घ्यायला हवी. आपले काम पाहून लोकांनी आपणाला सॅल्यूट करायला हवे, असा सल्ला इनामदार यांनी उपस्थित पोलिसांना दिला.

‘लोकमत’चा उपक्रम कौतुकास्पद - मंदा म्हात्रे
पोलीस आहेत, म्हणून आपण सुरक्षित आहोत. त्यांच्या कार्याची, त्यागाची दखल घेऊन ‘लोकमत’ने आयोजित केलेला हा गौरव सोहळा कौतुकास्पद आहे. ‘लोकमत’ची भूमिका ही नेहमीच समाजाभिमुख राहिली आहे. त्यामुळेच आज देशात क्रमांक एकचे दैनिक म्हणून ‘लोकमत’ने आपले स्थान पक्के केले आहे, असे प्रतिपादन आ. मंदा म्हात्रे यांनी केले.

‘लोकमत’ची नवीन परंपरा - नगराळे
पोलीस दलात दाखल होणारा प्रत्येक पोलीस अधिकारी व कर्मचारी शूर असतो. मात्र, प्रत्येकालाच पुरस्कार देता येत नाही. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने आयोजित केलेला हा गुणगौरव सोहळा स्तुत्य आहे. पोलिसांना सरकारतर्फे केवळ दोन प्रकारचे पुरस्कार दिले जातात. पुरस्कार मर्यादित आहेत. त्या तुलनेत मनुष्यबळ अधिक आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकाला पुरस्कार देणे शक्य नसते, असे नवी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे म्हणाले.

लोकाभिमुख उपक्रम - सोनवणे
प्रतिकूल परिस्थिती कायदा व सुव्यवस्था संभाळणाऱ्या पोलिसांचा सन्मान ही कौतुकास्पद बाब आहे. ‘लोकमत’चा हा उपक्रम लोकाभिमुख कार्यप्रणालीचा एक भाग असल्याचे मत नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनवणे यांनी व्यक्त केले. ‘लोकमत’ हे सर्वसामान्यांचा आवाज म्हणून जनमानसात रुजलेले दैनिक आहे. समाजातील पिढीत घटकांना न्याय मिळवून देतानाच अपप्रवृत्तीवर आसूड उगारण्याचे कामही ‘लोकमत’ने केले आहे.

Web Title: Police mental morale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.