ठाण्यातील वागळे इस्टेट आणि कोपरीमध्ये पोलिसांचे मॉकड्रील; दरड कोसळल्याने अडकलेल्या लोकांना वाचविले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2023 11:05 PM2023-05-10T23:05:07+5:302023-05-10T23:05:43+5:30
यामध्ये अग्निशमन दलासह आपत्ती व्यवस्थापन विभागाची पथकेही सहभागी झाली होती.
ठाणे : दरड कोसळल्यानंतर अडकलेल्या रहिवाशांना कसे वाचवायचे तसेच इमारत कोसळल्यानंतर ढिगाऱ्याखालील लोकांसाठी कसे बचावकार्य करायचे याचे मॉकड्रील श्रीनगर आणि कोपरी पोलिसांनी बुधवारी राबविले. यामध्ये अग्निशमन दलासह आपत्ती व्यवस्थापन विभागाची पथकेही सहभागी झाली होती.
वागळे इस्टेट रोड क्रमांक २८ येथील शिवराज मित्र मंडळ, आयटीआय सर्कल, याठिकाणी दरड कोसळली असून त्यामध्ये काही माणसे अडकली आहेत, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागासह श्रीनगर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना सायंकाळी ४.४० वाजण्याच्या सुमारास देण्यात आली होती. ही माहिती मिळताच विविध पथकांनी घटनास्थळी धाव घेत सायंकाळी ५ वाजेपर्यत हे बचावकार्य राबवून मॉकड्रील यशस्वी केले. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी , ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान, अग्निशमन दलाचे जवान इमर्जन्सी टेंडरसह उपस्थित होते.
या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. त्याचप्रमाणे सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास कोपरीतील अष्टविनायक चौकातील विनायक सोसायटी या ठिकाणी इमारतीचा काही भाग कोसळला असून त्यामध्ये काही रहिवाशी अडकल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन सह अग्निशमन दलालाही देण्यात आली. याठिकाणीही बचावकार्याचे मॉकड्रिल ६ वाजून ४० मिनिटांनी यशस्वी केल्याची मािहती सूत्रंांनी िदली.