विषारी रासायनिक द्रव्य टँकरद्वारे नाल्यात सोडणाऱ्या आरोपीला पोलिसांनी पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:40 AM2021-03-16T04:40:53+5:302021-03-16T04:40:53+5:30
वालधुनी नदी प्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनातदेखील सात आमदारांनी यासंदर्भात तारांकित प्रश्न विचारला होता. ...
वालधुनी नदी प्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनातदेखील सात आमदारांनी यासंदर्भात तारांकित प्रश्न विचारला होता. यावेळी राज्य सरकारकडून योग्य कारवाई होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, या प्रकरणाकडे सातत्याने दुर्लक्ष झाले आहे. त्यातच रात्रीच्या वेळी रासायनिक कारखान्यातील सांडपाणी थेट वालधुनीच्या पात्रात सोडण्याचे प्रकार अनेकवेळा उघडकीस आले आहेत. त्यावर कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. असे असताना रविवारी अंबरनाथ (प.) येथील मोरिवली एमआयडीसी परिसरात एमएच १२ एचडी १३२८ क्रमांकाच्या टँकरमधून वालधुनी नदीत विसर्जित होणाऱ्या एमआयडीसीजवळील नाल्यात विषारी रसायन सोडण्यात येत होते. यामुळे नाल्याच्या पाण्याचा रंग पूर्णपणे लालसर झाला होता. यासंदर्भात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) चे उपअभियंता श्रीकांत भिंगे यांना माहिती मिळाली असता, त्यांनी अंबरनाथ पोलिसांना माहिती दिली. यानंतर, अंबरनाथ पोलीस आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी प्रमोद लोणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही प्रशासनाच्या संयुक्त कारवाईत टँकर ताब्यात घेऊन टँकरचा मालक धीरज धुमाळ याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. या टँकरमध्ये रसायन कोणत्या कंपनीतून आणले गेले, त्या कंपनीचा मालक, सुपरवायझर याचा पोलीस तपास करीत आहेत.
..........
टँकरमालकास अटक
टँकरचा मालक धीरज धुमाळ हा गेल्या अनेक वर्षांपासून टँकरचा व्यवसाय करीत आहे. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. टँकरमध्ये रसायन भरणारी कंपनी, कंपनीचा मालक, सुपरवायझर यांच्याविरोधातदेखील पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.