महेश आहेर हल्ल्याप्रकरणी चौघांना पोलिसांची तडीपारीची नोटीस; नौपाडा सहायक आयुक्तांची कारवाई
By जितेंद्र कालेकर | Published: March 13, 2023 08:57 PM2023-03-13T20:57:16+5:302023-03-13T20:57:31+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसनी व्यक्त केला संताप
ठाणे : ठाणे महापालिकेचे सहायक आयुक्त महेश आहेर यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अभिजित पवार, हेमंत वाणी, विक्रम खामकर आणि विशंत गायकवाड या चौघांवर ठाण्यासह पाच जिल्ह्यांतून हद्दपार का करण्यात येऊ नये, अशी कारणे दाखवा नोटीस ठाणे पोलिसांनी सोमवारी बजावली. पोलिसांच्या या कारवाईबद्दल राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांच्या मागे गुंडाचा वावर असूनही पोलिस त्यांच्यावर का कारवाई करीत नाही, असा सवाल त्यांनी केला.
आहेर यांनी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मुली व जावयाच्या हत्येची सुपारी दिल्याबाबत एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यानंतर राष्ट्रवादीच्या हेमंत वाणी यांच्यासह चौघांनी महापालिका मुख्यालयाच्या गेटवर आहेर यांना मारहाण केली होती. नौपाडा पोलिस ठाण्यात आ. आव्हाड यांच्यासह सातजणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, भारतीय हत्यार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला होता. नौपाडा पोलिसांनी अभिजित पवार यांच्यासह चौघांना अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने चौघांची जामिनावर सुटका केली होती. यातील पवार यांच्यासह चौघांवर नौपाडा विभागाचे प्रभारी सहायक आयुक्त विलास शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यासह मुंबई, मुंबई उपनगरे, रायगड आणि पालघर या पाच जिल्ह्यांमधून दोन वर्षांसाठी हद्दपार का करण्यात येऊ नये, याबाबतची नोटीस साेमवारी बजावली आहे.
गोळ्या घातल्या तरी घाबरणार नाही : परांजपे
नौपाडा विभागाच्या सहायक आयुक्तांनी ६ मार्च २०२३ रोजीची ही नोटीस १३ मार्चला बजावली आहे. हेमंत वाणी यांच्यासह चौघांनाही २० मार्च २०२३ पर्यंत त्यांची बाजू मांडण्यासाठी वेळ दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खासगी आर्मी म्हणून ठाणे पोलिस काम करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गट यांच्यावर शिवसेना पक्षाकडून अनेक गुन्हे ठाणे पोलिसात दाखल होत आहे. मुख्यमंत्र्यांच्या मागे गुंडाचा वावर असून, त्यांच्यावर पोलिस का कारवाई करत नाही, असा प्रश्नही परांजपे यांनी केला. आम्हाला गोळ्या घाला, आम्ही घाबरणार नाही, असा इशाराही परांजपे यांनी दिला.
राजकीय गुन्हे करणारे तडीपार ; खुनाचे आरोपी मोकाट
राजकीय आंदोलनाचे गुन्हे दाखल असलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर तडीपारीची कारवाई करण्यासाठी नोटीस बजावली आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या आजूबाजूला त्यांच्या ताफ्यात आणि मुख्यमंत्र्यांच्या मंचावरच जन्मठेप झालेले गुंड दिसतात. त्यांच्यावर पोलिसांकडून कारवाई केली जात नाही. मुख्यमंत्र्यांच्या आजूबाजूला फिरणारे नामचीन गुंड पोलिस आयुक्तांना दिसत नाहीत का, असा सवालही परांजपे यांनी केला.