तीन लाख रुपयांची लाच मागणाऱ्या महापालिकेच्या आधिकाऱ्याला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2017 06:59 PM2017-10-25T18:59:57+5:302017-10-25T19:04:27+5:30
उत्तन येथील अनधिकृत चाळीच्या बांधकामावर पुन्हा कारवाई करु नये म्हणुन तीन लाख रुपयांची मागणी करणा-या व दुसरा हप्त्याची एक लाखांची रक्कम...
मीरारोड - उत्तन येथील अनधिकृत चाळीच्या बांधकामावर पुन्हा कारवाई करु नये म्हणुन तीन लाख रुपयांची मागणी करणा-या व दुसरा हप्त्याची एक लाखांची रक्कम स्विकारणा-या मीरा भार्इंदर महापालिकेचा प्रभाग अधिकारी स्वप्नील सावंत सह त्याचा चालक राजेंद्र खेडेकर या दोघांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. या मुळे अनधिकृत बांधकामांना पालिकेचा आशिर्वाद असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे.
उत्तनच्या स्टेला मॉरीस रुग्णालया जवळ मुनावर शेख यांनी ९ - ९ खोल्यांच्या दोन चाळी खाजगी जागेत बांधल्या होत्या. सदर चाळी अनधिकृत असल्याने काही राजकिय पदाधिकारी तसेच तथाकथीत लोकांनी तक्रारी चालवल्या होत्या. या मध्ये बहुतांशी तक्रारी ह्या अर्थपुर्ण असल्याचे सांगीतले जाते. दरम्यान तक्रारीं वरुन पालिकेने सदर चाळीवर तोडक कारवाई केली होती. परंतु निवडणुक काळात पुन्हा बेकायदा बांधकाम करण्यात आले.
दरम्यान या प्रकरणी प्रभाग समिती क्र. १ चे प्रभाग अधिकारी स्वप्नील सावंत यांनी शेख यांना चाळीवर पुन्हा तोडक कारवाई करायची नसेल तर ६ लाख रुपयांची मागणी केली होती. अखेर ३ लाखांवर सौदा ठरला. एक लाख रुपये आधीच सावंत यांनी त्यांचा चालक खेडेकर मार्फत घेतले होते. त्या नंतर उर्वरीत पैशांसाठी सावंत यांनी तगादा लावला होता.
त्या अनुषंगाने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक वाल्मीक पाटील व त्यांच्या पथकाने आज मंगळवारी १ लाख रुपयांचा दुसरा हप्ता शेख यांच्या कडुन स्विकारताना खेडेकर सह सावंत यांना अटक केली.
अटक आरोपींना भार्इंदर पोलीस ठाण्यात आणुन गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु होती. दरम्यान सावंत याच्या निवासस्थान आदी ठिकाणी धाड टाकण्यात आल्याचा पोली सुत्रांनी सांगीतले. या अनधिकृत बांधकाम प्रकरणी आलेल्या तक्रारी तसेच अन्य लोकांनी देखील पैशांची मागणी केली असल्याचची चर्चा असुन पोलीसांनी मात्र तपासात सबळ पुरावी हाती लागल्यास अन्य संबंधितां विरुध्द पण आवश्यक कारवाई केली जाईल असे सांगीतले.
सावंत यांना पालिका मुख्यालयाचे अभय
प्रभाग समिती क्र. १ च्या अखत्यारीत जय अंबे नगर पासुन मुर्धा, राई, मोर्वा, डोंगरी, उत्तन, चौक आदी मोठा परीसर येत असुन या भागात बेधडक अनधिकृत बांधकामे होत असल्याच्या तक्रारी सातत्याने येत होत्या. अगदी आयुक्तां पर्यंत येथील अनधिकृत बांधकामांच्या तक्रारी येत असताना कारवाई मात्र होत नव्हती. दुसरी कडे सावंत यांच्यावर अनधिकृत बांधकामांना पाठीशी घातल्याचा ठपका पालिकेने ठेवत त्यांच्या वर निलंबनाची कार्यवाही प्रस्तावीत केली होती. परंतु उपायुक्त मुख्यालय यांच्या अखत्यारीत असलेल्या आस्थापना विभागा कडुन मात्र सावंत यांच्यावर कारवाईस टोलवाटोलवी केली जात होती. सावंत यांना वेळीच निलंबित केले असते तर आज पालिकेच्या माथी आणखी एक लाचखोरीचा ठपका बसला नसता असे समोर आले आहे.