अक्षय शिंदेच्या गोळीबारात जखमी झालेले पाेलिस अधिकारी निलेश माेरेंना रुग्णालयातून डिस्चार्ज
By जितेंद्र कालेकर | Published: October 6, 2024 08:58 PM2024-10-06T20:58:00+5:302024-10-06T20:58:42+5:30
अक्षयच्या गोळीबारात एपीआय मोरे यांच्या पायाला गोळी लागून ते गंभीर जखमी झाले होते.
जितेंद्र कालेकर ( ठाणे), लाेकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आराेपी अक्षय शिंदे याने केलेल्या कथित गाेळीबारात जखमी झालेले गुन्हे अन्वेषण विभागाचे सहायक पाेलिस निरीक्षक ( एपीआय) निलेश माेरे यांना रुग्णालयातून शनिवारी डिस्चार्ज देण्यात आला. त्याआधी
शुक्रवारी वरिष्ठ पाेलिस निरीक्षक संजय शिंदे आणि पाेलिस हवालदार अभिजित माेरे यांनाही डिस्जार्ज मिळाला असून या तिघांच्याही प्रकृतीमध्ये आता सुधारणा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
तळाेजा कारागृहातून ठाण्यात चाैकशीसाठी आणले जात असताना २३ सप्टेंबर २०२४ राेजी मुंब्रा बायपासजवळ पाेलिस व्हॅनमध्ये निरीक्षक संजय शिंदे यांच्या गाेळीबारात अक्षय मारला गेला हाेता. त्याआधी अक्षयच्या गोळीबारात एपीआय मोरे यांच्या पायाला गोळी लागून ते गंभीर जखमी झाले होते. मोरे यांच्यासह दाेन अधिकारी आणि एक कर्मचारी अशा तिघांवर ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू होते. दोन आठवड्याच्या उपचारानंतर मोरे यांना ५ ऑक्टाेंबर राेजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. तर निरीक्षक शिंदे आणि हवालदार माेरे यांना ४ ऑक्टाेबर राेजी प्रकृतीत पूर्ण सुधारणा झाल्यानंतर घरी साेडण्यात आले.
या चकमकीच्या घटनेनंतर सत्ताधारी आणि विराेधकांमध्ये आराेप प्रत्याराेपांच्या फैरी झडल्या हाेत्या. तर मुंबई उच्च न्यायालयानेही पाेलिसांवर ताशेरे ओढले हाेते. सत्ताधारी पक्षासह मनसेने मात्र चकमकीतील जखमी अधिकाऱ्यांची पाठराखण केली हाेती. मनसेच्या नेत्या शर्मिला ठाकरे यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनीही या अधिकाऱ्यांची रुग्णालयात जाउन विचारपूस केली हाेती.