ठाण्यात पोलीस अधिकाऱ्याच्याच मोटारसायकलची चोरी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2021 10:05 PM2021-08-09T22:05:45+5:302021-08-09T22:11:27+5:30
मोटारसायकल चोरटयांनी आता सर्वच हद्द ओलांडली आहे. कापूरबावडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बी. एस. पवार यांचीच मोटारसायकल शनिवारी पहाटेच्या सुमारास बाळकूम येथून चोरीस गेली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: मोटारसायकल चोरटयांनी आता सर्वच हद्द ओलांडली आहे. कापूरबावडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बी. एस. पवार यांचीच मोटारसायकल शनिवारी पहाटेच्या सुमारास बाळकूम येथून चोरीस गेली आहे. याप्रकरणी पवार यांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात रविवारी तक्रार दाखल केली आहे.
एरव्ही, सर्वसामान्य नागरिकांच्या मोटारसायकली किंवा इतर वाहने चोरी होणे हे नित्याचेच झाले आहे. परंतू, बाळकूम येथील रुणवाल सीटीजवळ राम मारुतीनगर येथे उपनिरीक्षक पवार यांनी त्यांची मोटारसायकल उभी केली होती. ती ७ आॅगस्ट रोजी पहाटे २ ते सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास चोरीस गेली आहे. आताा आपलीच मोटारसायकल आपल्याच पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातून चोरीस गेल्याने तिच्या चोरीची तक्रार त्यांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात ८ आॅगस्ट रोजी दाखल केली आहे. विशेष म्हणजे या चोरीचा तपासही पवार यांच्याकडेच आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ते आता या चोरीचा तपास करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.