पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पोलीस पतीस सक्तमजुरी
By admin | Published: February 6, 2016 02:17 AM2016-02-06T02:17:21+5:302016-02-06T02:17:21+5:30
पोलीस पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त करून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या शहर पोलीस दलातील पोलीस कॉन्स्टेबल तथा पतीस ठाणे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती
ठाणे : पोलीस पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त करून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या शहर पोलीस दलातील पोलीस कॉन्स्टेबल तथा पतीस ठाणे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती बी.व्ही. बांबर्डे यांनी शुक्रवारी तीन वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. ही घटना घडली, त्या वेळी मयत ही सात महिन्यांची गरोदर होती.
कळव्यातील श्रीराम हिरवे (३०) असे शिक्षा सुनावलेल्या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे. तो ठाणेनगर पोलीस ठाण्यात कार्यरत होता. त्याचे २०१३ मध्ये मुंबई पोलीस दलातील मृत अर्चना हिच्याशी लग्न झाले होते. मात्र, श्रीरामला मामे बहिणीशी लग्न करायचे असल्याने त्याने अर्चनाचा शारीरिक व मानसिक छळ करण्यास सुरुवात केली. याचदरम्यान, ती सात महिन्यांची गरोदर असताना तिने पतीच्या छळास कं टाळून अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले होते. यामध्ये ती १०० टक्के भाजल्याने तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात तिचा भाऊ पोलीस कॉन्स्टेबल अभिजित मोरे याने फिर्याद दिली होती. त्यानुसार, गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी हिरवे याला अटक केली होती. हे प्रकरण ठाणे अतिरिक्त न्यायमूर्ती बांबर्डे यांच्या न्यायालयात आल्यावर शुक्रवारी सरकारी वकील बी.डी. हिंगे यांनी तर फिर्यादीच्या वतीने विशेष वकील म्हणून मनीषा परदेशी आणि राजेश मोरे यांनी युक्तिवाद केला. त्यात श्रीराम दोषी आढळला. त्याला पत्नीच्या मृत्यूस जबाबदार धरून न्या. बांबर्डे यांनी तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. तर, एक हजार रुपयांचा दंडही सुनावला आहे. (प्रतिनिधी)