अनंत चतुर्दशी व ईद-ए-मिलादुन्नबी पार्श्वभूमीवर भिवंडीत पोलिसांचे पथसंचलन
By नितीन पंडित | Published: September 27, 2023 08:02 PM2023-09-27T20:02:00+5:302023-09-27T20:02:11+5:30
भिवंडी पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील सहा ही पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचारी यांनी आपापल्या हद्दीमध्ये चोख बंदोबस्त ठेवला आहे.
भिवंडी : गुरुवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी होणारे गणेश विसर्जन व शुक्रवारी मुस्लिम धर्मीयांचा ईद-ए- मिलादुन्नबी हा उत्सव असल्या कारणाने भिवंडी शहरात या दोन्ही सण उत्सवा दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये व शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस विभागाने कंबर कसली आहे. भिवंडी पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील सहा ही पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचारी यांनी आपापल्या हद्दीमध्ये चोख बंदोबस्त ठेवला आहे. गणेश विसर्जन व ईद-ए-मिलादुन्नबी या सणांच्या पार्श्वभूमीवर बुधवारी सायंकाळी पोलीस संकुल येथून पथसंचालनाचे आयोजन करण्यात आले होते.या पथसंचलना मध्ये पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे यांच्या नेतृत्वा खाली सर्व पोलीस अधिकारी,पोलीस कर्मचारी,महिला पोलीस सहभागी झाले होते.भिवंडी पोलीस संकुल,वंजार पट्टी नाका ते कॉटर गेट मज्जिद पर्यंत हे पोलिस पथसंचलन करण्यात आले.
गणेशोत्सव व ईद सण एकत्रच आल्याने शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून सुमारे ५०० पोलीस कर्मचारी व अधिकारी शहरात तैनात असून एसआरपीएफच्या दोन कंपन्या,एक दंगा नियंत्रण पथक,१०० होमगार्ड असा फौजफाटा शहरात तैनात करण्यात आला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी दिली आहे.