हल्ल्यांच्या घटनांमुळे स्कायवॉकवर पोलिसांची गस्त वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 12:47 AM2019-11-11T00:47:31+5:302019-11-11T00:47:34+5:30
शिवीगाळ केल्याचा जाब विचारणाऱ्या दोघांसह त्यांना वाचविण्यासाठी गेलेल्या त्याच्या मित्रावर चाकूने हल्ला केल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली आहे.
डोंबिवली : स्कायवॉकवरून उतरत असताना शिवीगाळ केल्याचा जाब विचारणाऱ्या दोघांसह त्यांना वाचविण्यासाठी गेलेल्या त्याच्या मित्रावर चाकूने हल्ला केल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली आहे. तसेच २२ मार्चला सायंकाळी केडीएमसीचे डोंबिवलीतील बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष पाटील यांच्यावर चार हल्लेखोरांनी शस्त्राने हल्ला चढविला होता. वाढत्या हल्ल्यांच्या घटना विचारात घेऊन आता पोलिसांनी तेथे रात्रीच्या सुमारास गस्त ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. स्कायवॉकवर बुधवारी झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.या घटनेमुळे पुन्हा रामनगर पोलिसांच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत.
ठाण्यात राहणारे पाटील हे सायंकाळी कार्यालयातून घरी जात असताना त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. ते महापालिकेच्या विभागीय कार्यालयातून निघाल्यावर स्कायवॉकने डोंबिवली स्थानकाकडे जात होते. त्यावेळी पाटकर रोडवरील स्कायवॉकवर दबा धरून बसलेल्या चौघांनी त्यांच्यावर पेनसारख्या तीक्ष्ण हत्याराने वार केले. यामध्ये पाटील यांच्या पोटावर, छातीवर, े पाच ते सहा वार झाले होते. पाटील यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले गेल्याने त्यांचे प्राण वाचले.