प्रशासकीय कामकाज सुलभतेसाठी पोलीस कर्मचाऱ्यांचे ‘समाधान’
By admin | Published: May 2, 2017 02:30 AM2017-05-02T02:30:31+5:302017-05-02T02:30:31+5:30
पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रशासकीय कामकाज आणखी सुलभ व्हावे, यासाठी समाधान हेल्पलाईनचा शुभारंभ सोमवारी करण्यात
ठाणे : पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रशासकीय कामकाज आणखी सुलभ व्हावे, यासाठी समाधान हेल्पलाईनचा शुभारंभ सोमवारी करण्यात आला. महाराष्ट्र दिनानिमित्त पोलीस आयुक्तालयातर्फे आणखी काही उपक्रम हाती घेण्यात आले असून, त्यानुसार दवाखाना आणि विश्रांतीगृहाचे नुतनीकरणदेखील करण्यात आले आहे.
महाराष्ट्र दिनानिमित्त साकेत भागातील पोलीस कवायत मैदानावर सोमवारी सकाळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली. यावेळी पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना पुरस्कार आणि पदकांचे वितरण करण्यात आले. यावेळी पोलीस आयुक्त परमबीर सिंह, सह पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय, अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) मकरंद रानडे, कोकण परिक्षेत्राचे आयुक्त नवल बजाज, ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक महेश पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार अनंत तरे आदी नेत्यांसह स्वातंत्र्य सैनिक आणि सामान्य ठाणेकर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कळवा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त आर. एम. धुमाळ आणि राखीव पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्या अधिपत्याखाली विविध तुकड्यांनी राष्ट्रध्वजास मानवंदना दिली.
ठाणे पोलीस आयुक्तालयातील अधिकारी, तसेच न्यायालयीन अथवा इतर प्रशासकीय कामासाठी बाहेरगावहून आलेल्या अधिकाऱ्यांना तात्पुरती विश्रांती घेता यावी, यासाठी पोलीस मुख्यालयाजवळ पोलीस विश्रांतीगृह बांधण्यात आले आहे. या विश्रांतीगृहाचे नुतनीकरण करून ते आणखी आरामदायी करण्यात आले आहे.
विश्रांतीगृहाची नव्याने रंगरंगोटी करून, येथील २३ कक्षांमध्ये एलसीडी टीव्ही, फॅन, कुलर, गरम पाण्याची सोय, खुर्च्या इत्यादींची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय प्रशस्त स्वागत कक्ष आणि प्रतिक्षागृह तयार करण्यात आले असून, भोजनकक्षाची सुविधाही करण्यात आली आहे. पोलीस आयुक्तांच्या हस्ते या विश्रांतीगृहाचे उद्घाटन करण्यात आले.
पोलीस आयुक्तालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय कामांचा निपटारा त्वरेने व्हावा आणि कामकाजात पारदर्शकता यावी, यासाठी पोलिसांकरीता समाधान हेल्पलाईनचे उद्घाटन पोलीस आयुक्तांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. पोलिसांवर कामाचा अतिरिक्त ताण नेहमीच असतो. अशा स्थितीत स्वत:च्या प्रशासकीय कामांसाठी त्यांना बरेचदा काम सोडून आयुक्तालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात. समाधान हेल्पलाईनच्या मदतीने आता पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्यांची स्वत:ची प्रशासकीय कामे सुलभ पद्धतीने करणे शक्य होणार आहे.
पोलीस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या तसेच सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या आरोग्यविषयक समस्यांवर त्वरित आणि प्रभावी उपचार करता यावे, यासाठी पोलीस मुख्यालयाजवळील पोलीस दवाखान्याचे नुतनीकरण करण्यात आले आहे. तज्ज्ञ डॉक्टरांकडून पोलीस कुटुंबियांच्या आरोग्याची तपासणी, निदान आणि औषधोपचार या दवाखान्यात करता येणार आहे. नुतनीकरण करून दवाखान्यामध्ये काही नवे कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत. आता पोलीस कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबियांसाठी येथे दंत कक्ष, नेत्र चिकित्सा कक्ष तसेच स्त्रीरोग कक्ष तयार करण्यात आले आहेत. नुतनीकरणामुळे नवे रूप मिळालेल्या या दवाखान्याचे उद्घाटन पोलीस आयुक्तांच्या हस्ते करण्यात आले.
पोलिसांच्या सबसिडी कॅन्टिनचे रुपही आता बदलले आहे. येथे नव्याने ई-दालन सुरु करण्यात आले आहे. या दालनात पोलिसांना एलईडी टीव्ही, एअर कंडिशनर, संगणक, रेफ्रिजरेटर, मिक्सर, टोस्टर, फॅन, ओव्हन, इस्त्री, व्हॅक्युम क्लिनर, होम थिएटर अशा अनेक गृहोपयोगी इलेक्ट्रॉनिक वस्तु सवलतीच्या दरात उपलब्ध करण्यात आल्या आहेत. पोलीस आयुक्तांच्या हस्ते या दालनाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी पोलीस उपायुक्त (गुन्हे) अभिषेक त्रिमुखे, पोलीस उपायुक्त (परिमंडळ ५) सुनील लोखंडे, पोलीस उपायुक्त (आर्थिक गुन्हे शाखा) संदीप भाजीभाकरे, पोलीस उपायुक्त (वाहतूक) संदीप पालवे, पोलीस उपायुक्त (मुख्यालय) डॉ. रश्मी करंदीकर यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
विश्रांतीगृहाचे नुतनीकरण
पोलीस कर्मचाऱ्यांचे निवास असलेल्या सिद्धी हॉलजवळ बगीचा सौंदर्यीकरणाच्या कामाचे भूमिपुजन यावेळी पोलीस आयुक्तांच्या हस्ते करण्यात आले. भारत स्वच्छता अभियानांतर्गत एचपीसीएलच्या सहकार्याने हे काम होणार आहे. सुमारे पाच हजार चौरस फुटामध्ये सौंदर्यीकरणाचे काम प्रस्तावित आहे.
पाण्याचे आकर्षक कारंजे, लहान मुलांसाठी झोपाळे, घसरगुंडी तसेच खेळाची इतर साधने इथे उभारली जाणार आहेत. याशिवाय विविध जातींची शोभीवंत झाडेही लावली जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी पोलीस आयुक्तांसह मधुकर पाण्डेय, मकरंद रानडे आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
सहायक आयुक्त हातोटे यांचा गौरव : अनेक मोठे गुन्हे उघडकीस आणून ठाणे पोलिसांचा नावलौकिक उंचावणारे गुन्हे अन्वेषण शाखेचे सहायक पोलीस आयुक्त (घटक क्र. १) मुकुंद हातोटे यांचा पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह देऊन यावेळी गौरव करण्यात आला. करवसुलीच्या नावाखाली अमेरिकन नागरिकांकडून खंडणी उकळणाऱ्या मीरा रोडवरील बोगस कॉल सेंटर्ससह, सैन्य भरतीची प्रश्नपत्रिका फोडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश हातोटे यांनी केला होता. त्यांच्या कार्याची दखल घेऊन पोलीस दलातील प्रशंसनीय सेवेसाठीचे पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह हातोटे यांना जाहीर झाले होते. याबाबतचे प्रशस्तीपत्र त्यांना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान केले.