CoronaVirus News: सहकाऱ्याच्या पत्नीसाठी पोलिसाचे प्लाझ्मादान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2020 12:27 AM2020-10-09T00:27:39+5:302020-10-09T00:28:08+5:30
उपचारास मदत; कोरोनातून मिळाली मुक्ती
मुंब्रा : शीळ-डायघर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले दीपक जाधव यांनी त्यांच्या सहकारी पोलीस हवालदाराच्या पत्नीला प्लाझ्मादान केल्यामुळे ती कोरोनामुक्त झाली. त्यांच्या या कृतीबद्दल सर्व स्तरांतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
शीळ-डायघर पोलीस ठाण्यातील एका हवालदाराला कर्तव्य बजावत असताना कोरोनाची लागण झाली. हे वेळीच निदर्शनास न आल्याने त्याची पत्नीही बाधित झाली. तिची प्रकृती जास्त खालावल्याने प्लाझ्माची आवश्यकता असल्याचे तिच्यावर उपचार करणाºया डॉक्टरांनी सांगितले. हवालदाराने ही बाब वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांना सांगितली. जाधव तसेच त्यांचे सहकारी प्लाझ्मादान करणाऱ्यांचा तपास करत असतानाच त्यांना दीपक जाधव यांनी कोरोनावर मात केल्याचे तसेच त्यांचा प्लाझ्मा उपचार हवालदाराच्या पत्नीला चालणार असल्याचे समजले. हे कळताच वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण करून प्लाझ्मादान करण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आली.