भिवंडीतील पोलीस चौकी पाडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 12:08 AM2019-01-13T00:08:19+5:302019-01-13T00:08:38+5:30
बिल्डर लॉबीचा हात : दोन पालिका कर्मचाऱ्यांना केली अटक
भिवंडी : शहरात निजामपूर परिसरातील बौद्धवाडा येथे राहणाºयांच्या संरक्षणासाठी उभारलेली पोलीस चौकी स्थानिक बिल्डर लॉबीने पालिकेच्या बांधकाम विभाग व प्रभाग समितीच्या अधिकारी, कर्मचाºयांना हाताशी धरून जमीनदोस्त केली. याप्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात बिल्डर त्रिकुटासह पालिकेच्या तीन कर्मचाºयांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी दोन पालिका कर्मचाºयांना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, चौकी तोडण्यासाठी वापरण्यात आलेले जेसीबी, डम्पर व इतर साधनसामग्री पोलिसांनी अद्याप जप्त केलेली नाही.
शहरात जागेचे भाव वाढले असताना बिल्डर लॉबीने सरकारी जागेला लक्ष्य बनवले आहे. त्याचप्रमाणे निजामपूर भागातील बौद्ध समाजबांधवांच्या संरक्षणासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने १९८६ मध्ये पोलीस चौकी उभारली होती. या चौकीचे काम निजामपूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत सुरू होते. शहरात स्वच्छ अभियानाची मोहीम सुरू आहे. स्थानिक बिल्डरने या अभियानाच्या आडून पालिकेच्या बांधकाम विभागातील अधिकारी व कर्मचाºयांच्या संगनमताने शुक्रवारी रात्रीच्या सुमारास बंद असलेली निजामपूर भागातील बौद्धवाडा पोलीस चौकी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवरील बांधकाम पाडले. हे बांधकाम पाडण्यासाठी पालिकेची कोणतीही परवानगी घेतली नव्हती.
बांधकाम तोडल्यानंतर दीड लाखाचे साहित्य जागेवरून चोरून नेले. ही घटना समजताच निजामपूर पोलीस ठाण्यातील पोलिसांनी बिल्डर मुद्दसीर नदीम बर्डी, फैजल रशीद अबूजी, मुनवर गुलाम रसुल शेख, पालिका कर्मचारी नईम मेहबूब शेख (मुकादम), समशुजमा मोहम्मद इसा अन्सारी, मुजाहिद अन्सारी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.