पोलिसांनी वेळेत रोखला बालविवाह
By admin | Published: January 23, 2017 05:35 AM2017-01-23T05:35:09+5:302017-01-23T05:35:09+5:30
पोलीस नेहमीच गुन्हा घडल्यानंतर पोहोचतात. पण, ठाण्यात बालविवाहाचा गुन्हा घडण्यापूर्वीच ठाणे शहर पोलिसांनी लावलेल्या हजेरीने
पंकज रोडेकर / ठाणे
पोलीस नेहमीच गुन्हा घडल्यानंतर पोहोचतात. पण, ठाण्यात बालविवाहाचा गुन्हा घडण्यापूर्वीच ठाणे शहर पोलिसांनी लावलेल्या हजेरीने वरातीविनाच वऱ्हाडाला घरी परतावे लागले. अवघ्या १५ मिनिटांपूर्वी पोलिसांना माहिती मिळाली. त्यातच, वाहतूककोंडीचे विघ्न असताना त्यातूनही मार्ग काढत लग्नाच्या पाच मिनिटांपूर्वीच पोलीस मंडपात दाखल झाले.
लग्नाचा मुहूर्त जवळ आला होता. दोन्ही बाजूंची वऱ्हाडी मंडळी मंडपात जमलीही होती. अक्षता पडणार तोच पोलीस मंडपात दाखल झाल्याचे पाहून जमलेले सर्वच जण घाबरले. कळव्यातील जयभीमनगर येथे एका अल्पवयीन मुलीचा विवाह सोहळा होत असल्याची माहिती ठाणे शहर पोलीसचे सहायक पोलीस आयुक्त भरत शेळके यांना स्नेहा नावाच्या संस्थेकडून मिळाली. बालविवाह हा कायद्याने गुन्हा असल्याने शेळके यांनी क्षणाचाही विलंब न लावता ठाणे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांना घटनास्थळी पोहोचण्यास सांगितले. त्यानुसार, दौंडकर आणि सहायक पोलीस निरीक्षक काकासाहेब बर्गे यांचे पथक घटनास्थळी निघाले. कळवा ब्रिज सोडत नाही, तोच वाहतूककोंडी झाली होती. पण, वेळ कमी असल्याने पोलिसांनी सायरन वाजण्यास सुरुवात करीत मार्ग काढून लग्नमंडपात वेळेच्या पाच मिनिटे पोहोचण्याची किमया दाखवली. त्यामुळे हा बालविवाह थांबवण्यात त्यांना यश आले. या वेळी सामाजिक संस्थेने दिलेल्या माहितीची खातरजमा केल्यावर ती खरी असण्यावर शिक्कामोर्तब झाले. मंडपातून वरात निघण्याऐवजी पोलिसांनी वधूवराला आणि त्यांच्या कुटुंबीयांना थेट पोलीस ठाण्यात आणले. या वेळी दोन्ही कुटुंबीयांचे समुपदेशन करताना वधूचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यावर लग्नाची हमी घेतल्यावर त्यांना आपापल्या घरी जाण्याची परवानगी दिल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. क