पतसंस्थांच्या कर्ज वसुलीसाठी पोलीस संरक्षण, समिती गठित करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 12:44 PM2018-09-14T12:44:14+5:302018-09-14T12:46:57+5:30
पतसंस्थांना कर्ज वसुली करण्यासाठी पोलीस बंदोबस्ताची गरज असते.
ठाणे - पतसंस्थांना कर्ज वसुली करण्यासाठी पोलीस बंदोबस्ताची गरज असते. त्यासाठी लवकरच सहाय्यक पोलीस आयुक्त आणि ठाणे जिल्हा नागरी/पगारदार सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. यांची संयुक्त समिती गठित करुन तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी दिले आहे.
ठाणे जिल्हा नागरी/पगारदार सहकारी पतसंस्था फेडरेशन लिमिटेडची 18 वी अधिमंडळाची वार्षिक बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीला प्रमुख अतिथी म्हणून पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर हे उपस्थित होते. यावेळी त्यांनी हे आश्वासन दिले. या बैठकीच्या वेळी ठाणे जिल्हा नागरी/ पगारदार सहकारी पतसंस्था फेडरेशन लि.चे अध्यक्ष शिवाजीराव शिंदे यांनी पतसंस्थांना वसुलीमध्ये अनेक अडचणी येत असतात. त्यासाठी पोलीस संरक्षणाची गरज असल्याचे सांगितले. त्यावर बोलताना फणसाळकर यांनी, पतसंस्थांना वसुली करताना अडचणी येत असतील तर त्या सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील.
वसुलीसाठी पोलीस बंदोबस्त देण्याबाबत सहाय्यक पोलीस आयुक्त अभय सायगावकर आणि ठाणे जिल्हा नागरी/ पगारदार सहकारी पतसंस्था फेडरेशन लि.यांची संयुक्त समिती गठीत करुन या समितीच्या अहवालानंतर तोडगा काढण्यात येईल. मात्र, पतसंस्थांनी देखील कर्ज धोक्यात येणार नाही, याची परिपूर्ण काळजी घ्यावी. जेणेकरुन कर्जदार सदस्य थकीत जाणार नाही. त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची वेळ येणार नाही, असे सांगितले. तसेच, ठाणे जिल्हा नागरी/ पगारदार सहकारी पतसंस्था फेडरेशन लि.च्या कामाचे कौतूकही त्यांनी केली. यावेळी ठाणे जिल्हा नागरी/ पगारदार सहकारी पतसंस्था फेडरेशन लि.चे उपाध्यक्ष डॉ. शामराव पाटील, सचिव वसंत पिसाळ, खजिनदार रमेश चव्हाण यांच्यासह संपूर्ण संचालक मंडळ उपस्थित होते.