बालकामगारांविरोधात पोलिसांची धडक मोहीम
By admin | Published: February 5, 2016 02:35 AM2016-02-05T02:35:25+5:302016-02-05T02:35:25+5:30
हरवलेल्या बालकांचा शोध घेतानाच बाल कामगारविरोधात हाती घेण्यात आलेल्या धडक मोहिमेत विरार, नालासोपारा आणि सफाळे परिसरातून २५ बाल कामगारांची सुटका करण्यात आली.
शशी करपे, वसई
हरवलेल्या बालकांचा शोध घेतानाच बाल कामगारविरोधात हाती घेण्यात आलेल्या धडक मोहिमेत विरार, नालासोपारा आणि सफाळे परिसरातून २५ बाल कामगारांची सुटका करण्यात आली. यावेळी चौदा जणांवर गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून प्रत्येक वीस हजार रुपये दंडही वसूल करण्यात आला. तर पालघर जिल्ह्यातून महिन्याभरात तब्बल १७८ बालकांचा शोध घेऊन त्यापैकी १५३ बालकांना पालकांच्या हवाली करण्यात आले आहे. उर्वरित बालकांना बाल गृहात पाठवून त्यांच्या पुनर्वसनाचे काम हाती घेण्यात आले आहे.
पालघर जिल्हा बाल संरक्षण कक्षाने पालघर जिल्हा पोलीस, वुमन ट्रॅफिकिंंग सेल, रेल्वे पोलिसांच्या मदतीने आॅपरेशन स्माईल-२ अभियान हाती घेतले असून जानेवारी महिन्यात केलेल्या धडक कारवाईत विरार, नालासोपारा आणि सफाळे परिसरातील दुकानांमध्ये काम करणाऱ्या २५ बालकांची सुटका केली. यावेळी चौदा दुकानदारांवर स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करून त्यांच्यावर प्रत्येकी २० हजार रुपये दंडाची कारवाई केली.
या बालकांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. तसेच विविध ठिकाणांहून १७८ बालकांचा शोध घेण्यात आला आहे. यातील १५३ बालकांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.
उर्वरित २५ बालकांना बाल कल्याण समितीच्या आदेशानंतर जिल्ह्यातील बालगृहात ठेवण्यात आले असून त्यांची पुनर्वसनाची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यातील पालघर जिल्ह्यातील अपवाद वगळता बरीचशी बालके नेपाळ, बिहार, राजस्थान. उत्तरप्रदेश आदी राज्यातील आहेत, अशी माहिती जिल्हा बाल संरक्षण अधिकारी संदीप लांजेवार यांनी दिली. येथील व्यावसायिक अल्प पगारात दिवस-रात्र काम करणारे मजूर म्हणून त्यांना अधिक पसंती देतात.
दरम्यान, ठाणे ग्रामीण पोलीस अधिक्षक राजेश प्रधान यांनीही आॅपरेश स्माईल अंतर्गत जिल्ह्यातील बेपत्ता आणि हरवलेल्या बालकांचा शोध घेण्यात यश मिळवले आहे. यासंदर्भात अधिक शोध सुरु आहे. ठाणे ग्रामीण पोलीस अधिक्षकांच्या हद्दीत १ जानेवारी २०१० ते डिसेंबर २०१५ (आॅगस्ट २०१४ पर्यंत यात पालघर जिल्ह्याचा समावेश होता) पर्यंत १ हजार ३१ मुली हरवल्याची नोंद होती. यातील १ हजार १५ मुली सापडल्या होत्या तर १६ मुली बेपत्ता होत्या. तसेच ६६१ मुले बेपत्ता झाल्याची नोंदी होत्या. त्यापैकी ६३५ मुले सापडली होती. तर २६ मुले बेपत्ता होती.