ठाण्यात आॅनलाईन जुगार अड्डयांवर दोन ठिकाणी पोलिसांचे धाडसत्र: ११ जुगाऱ्यांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 09:25 PM2019-03-12T21:25:09+5:302019-03-12T21:33:35+5:30
सावरकरनगर आणि लोकमान्यनगर भागात आॅनलाईन जुगार सुरु असल्याची तक्रार ठाण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांच्याकडे एका सामाजिक कार्यकर्त्याने केली होती. याच तक्रारीची दखल घेत पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी ठाण्यातील दोन जुगार अड्डयांवर कारवाईचे आदेश दिल्यानंतर ११ जणांना अटक करण्यात आली.
ठाणे: संगणकांवर बेकायदेशीरपणे आॅनलाईन जुगार चालविणाऱ्या लोकमान्यनगर आणि सावरकरनगर अशा दोन ठिकाणच्या अड्डयांवर वर्तकनगर पोलिसांनी सोमवारी धाडसत्र राबविले. या दोन्ही कारवाईमध्ये ११ जणांची धरपकड करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. या कारवाईमध्ये संगणक, काही रोकड आणि लुगाराच्या सामुग्रीसह ७१ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
सावरकर नगर येथील ठाणे परिवहन सेवेच्या बस थांब्याजवळील परिसरात तसेच लोकमान्य नगर पाडा क्रमांक चार या दोन ठिकाणी आॅनलाईन जुगार अड्डे सुरु असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप गिरधर यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे गिरधर तसेच सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर आव्हाड यांच्या पथकांनी या दोन्ही अड्डयांवर सोमवारी दुपारी एकाच वेळी धाडसत्र राबविले. त्यावेळी इंटरनेटच्या सहाय्याने आॅनलाईन जुगार सुरु होता. यात सावरकर नगर येथील अड्डयावरुन ४४ हजार ४७० तर लोकमान्यनगर येथील अड्डयावरुन २६ हजार ५३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमध्ये मनोज जैस्वाल, बबलू थापा, सुरेश कदम,अर्जुन पाटकर, शंकर प्रजापती, शिवाजी पाचिपल्ले आणि शिबूसनक राजकुमार यांना तर लोकमान्य नगर येथून किरण मोरे ,मनोज आगारे आणि जनक शर्मा आदी ११ जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले.
वर्तकनगर येथील एका सामाजिक कार्यकर्त्याने या जुगाराची तक्रार ठाण्याचे अप्पर पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांच्याकडे केली होती. पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांच्या मार्गदर्शनाखाली वर्तकनगर पोलिसांनी ही कारवाई केल्याची माहिती सूत्रांनी दिली.