पोलिसांनी चोरीच्या ५१ गुन्ह्यातील १ कोटी ७ लाखांचा मुद्देमाल नागरिकांना मिळवून दिला
By धीरज परब | Published: January 25, 2023 12:53 AM2023-01-25T00:53:54+5:302023-01-25T01:01:03+5:30
२०२२ सालात तसेच सध्या सुरु असलेल्या जानेवारी महिन्यात चोरी वा घरफोडीच्या घडलेल्या गुन्ह्यां पैकी ५१ गुन्ह्याचा तपास करण्यात पोलिसांना यश आले आहे.
मीरारोड - मीरा भाईंदरमधील ६ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत, गेल्या वर्षात आणि चालू महिन्यात घडलेल्या चोरीच्या एकूण ५१ गुन्ह्यातील तब्बल १ कोटी ७ लाख रुपयांचा चोरीचा मुद्देमाल पोलिसांनी मूळ मालकांना परत मिळवून दिला आहे. मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ १ मध्ये मीरा भाईंदरची काशिमीरा, मिरा रोड,नवघर, नया नगर, भाईंदर व उत्तन अशी ६ पोलीस ठाणी येतात.
२०२२ सालात तसेच सध्या सुरु असलेल्या जानेवारी महिन्यात चोरी वा घरफोडीच्या घडलेल्या गुन्ह्यां पैकी ५१ गुन्ह्याचा तपास करण्यात पोलिसांना यश आले आहे. चोरीला गेलेला ऐवज मिळेलच याची सामान्य नागरिकांना शाश्वती नसते. परंतु पोलिसांनी केलेल्या कौशल्यपूर्ण तपासा मुळे सदर ५१ गुन्ह्यातील १ करोड ७ लाख ५२ हजारांचा मुद्देमाल पोलिसांना हस्तगत करता आला.
पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांच्या हस्ते चोरीला गेलेला मुद्देमाल संबंधित नागरिकांना मीरारोड येथील एका कार्यक्रमात परत करण्यात आला. परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त जयंत बजबळे, सहायक आयुक्त विलास सानप , शांतीलाल जाधव व शशिकांत भोसले सह पोलीस अधिकारी अंमलदार व नागरिक उपस्थित होते. यावेळी पोलिसांनी तपास करून मिळवलेल्या ३ चारचाकी , २ ऑटो रिक्षा, ८ दुचाकी , १५ मोबाईल, सोन्याचे दागिने,रोख रक्कम व इतर मूल्यवान वस्तू नागरिकांना परत करण्यात आल्या.
पोलिसांनी चोरीला गेलेली वाहने , दागिने , मोबाईल आदी वस्तू परत मिळवून दिल्या बद्दल नागरिकांनी पोलिसांचे आभार मानत आनंद व्यक्त केला. पोलिसांचा पाहुणचार व आपुलकीचे वातावरण पाहून काही नागरिकांना गहिवरून आले. यावेळी नागरिकांनी स्वतःच्या मालमत्तेच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी , मदतीसाठी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केली.