कासकरला पुन्हा पोलीस कोठडी?, मकोका न्यायालयाला पोलिसांची विनंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 06:29 AM2017-10-24T06:29:50+5:302017-10-24T06:29:54+5:30
ठाणे : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरसह चार आरोपींच्या पोलीस कोठडीची विनंती पोलिसांनी सोमवारी विशेष मकोका न्यायालयाला केली.
ठाणे : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरसह चार आरोपींच्या पोलीस कोठडीची विनंती पोलिसांनी सोमवारी विशेष मकोका न्यायालयाला केली. खंडणीच्या गुन्ह्यामध्ये हे आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
ठाण्यातील एका बिल्डरकडून खंडणी उकळल्याप्रकरणी इक्बाल कासकर, त्याचे हस्तक मुमताज एजाज शेख, इसरार जमीर अली सय्यद आणि छोटा शकीलचा फायनान्सर पंकज गंगर यांना खंडणीविरोधी पथकाने सप्टेंबर महिन्यात अटक केली होती. जागेच्या वादातून व्यावसायिकांकडून खंडणी उकळल्याचा एक गुन्हा त्यांच्याविरुद्ध कासारवडवली येथे तर दोन गुन्हे ठाणेनगर पोलीस ठाण्यात दाखल आहेत. जवळपास एक महिना ते पोलीस कोठडीत होते. पोलिसांनी जमा केलेले पुरावे आणि आरोपींच्या जबाबातून संघटित गुन्हेगारीवर शिक्कामोर्तब झाले. त्यानुसार त्यांच्याविरुद्ध मकोकाअंतर्गत कारवाई करण्यात आली. सद्य:स्थितीत हे चारही आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. आरोपींचा ताबा तुरुंगामार्फत थेट पोलिसांना दिला जाईल. तशी विनंती पोलिसांनी सोमवारी विशेष मकोका न्यायालयास केली. मकोकाअंतर्गत आरोपपत्र दाखल करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत असून, आरोपींना ३० दिवसांपर्यंत पोलीस कोठडी देण्याची तरतूद आहे. मात्र ही पोलीस कोठडी एकाच टप्प्यात मिळेल, असे आवश्यक नाही. तपासाची प्रगती वेळोवेळी न्यायालयासमोर मांडून आरोपींची पोलीस कोठडी पोलिसांना वाढवून घ्यावी लागणार आहे.
>मालमत्ता जप्तीची प्रक्रिया
आरोपींनी एखाद्या गुन्ह्यातून जमविलेल्या पैशातून मालमत्ता घेतली असेल, तर ती जप्त करण्याची तरतूद मकोकामध्ये आहे. या तरतुदीनुसार आरोपींची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया पोलीस यंत्रणा सुरू करणार आहे. कासारवडवली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये आरोपींनी बिल्डरकडून फ्लॅट बळकावले होते. त्यापैकी एक फ्लॅट आरोपी मुमताज एजाज शेख याच्या नावे आहे. आणखी दोन फ्लॅट विकून त्यापोटी मिळालेला पैसाही आरोपींनी बिल्डरकडून वसूल केला होता. या पैशांतून आरोपींनी कुठे-कुठे मालमत्ता घेतली याची चौकशी करून ती जप्त करण्याची प्रक्रिया पोलीस करणार आहेत.