बदलापुरातील देहविक्री व्यवसायावर पोलिसांची धाड, दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 01:49 AM2018-04-20T01:49:47+5:302018-04-20T01:49:47+5:30
बदलापूर येथील एका लॉजमध्ये चालणाऱ्या देहविक्रय व्यवसायावर ठाण्याच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने बुधवारी सायंकाळी धाड टाकली. लॉजच्या व्यवस्थापकासह दोघांना पोलिसांनी अटक करून दोन पीडित महिलांची सुटकाही केली.
ठाणे : बदलापूर येथील एका लॉजमध्ये चालणाऱ्या देहविक्रय व्यवसायावर ठाण्याच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने बुधवारी सायंकाळी धाड टाकली. लॉजच्या व्यवस्थापकासह दोघांना पोलिसांनी अटक करून दोन पीडित महिलांची सुटकाही केली.
बदलापूर येथील कर्जत रोडवरील जुन्या पेट्रोलपंपासमोर असलेल्या हॉटेल वेंकिज लॉजिंगवर ठाण्याच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांच्या पथकाने बुधवारी सायंकाळी धाड टाकली. या चार मजली इमारतीचा तळ मजला आणि पहिला मजला हॉटेलसाठी वापरला जात होता. उर्वरित तीन मजल्यांवरील ३० खोल्यांमध्ये लॉजिंगच्या नावाखाली देहविक्रय व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी बुधवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास धाड टाकून लॉजचा व्यवस्थापक राकेश किसनमोहन कैथ आणि वेटर गणेश मल्लिकार्जुन कलशेट्टी यांना अटक केली. राकेश कैथ हा मूळचा पंजाबचा असून तो दोन वर्षांपासून लॉजवर कामाला होता. वेटर गणेश हा मूळचा लातूर येथील असून तो आठ महिन्यांपासून तिथे कामाला होता.
या लॉजवर जवळपास तीन महिन्यांपासून अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी धाड टाकून देहविक्रय करणाºया दोन मुलींना ताब्यात घेतले. त्यापैकी एक मुलगी अंबरनाथ येथील तर दुसरी उल्हासनगरची आहे. याप्रकरणी बदलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पीडित मुलींची सुटका करण्यात आली आहे.
लॉजवर चालणाºया अनैतिक धंद्याचे उत्पन्न थेट मालकाला मिळायचे. या उत्पन्नाचा निम्म्यापेक्षा कमी वाटा तो पीडित मुलींना द्यायचा. त्यामुळे मालकाचा या गुन्ह्यामध्ये थेट सहभाग असल्याने मालक आणि लॉजच्या चालकाचा शोध घेण्यासाठी आरोपींना पोलीस कोठडी देण्याची विनंती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी न्यायालयास केली. न्यायालयाने ती ग्राह्य धरून दोन्ही आरोपींना २१ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.