मोर्वा गावातील कांदळवन तोडून बांधकाम केल्याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 08:15 PM2019-08-22T20:15:19+5:302019-08-22T20:15:37+5:30
लोकमतने बुधवारीच मोर्वा, राई, मुर्धा भागात सरकारी जमिनींवरील कांदळवन तोडून बांधकामे होत असल्याचे वृत्त दिले होते.
मीरारोड - भाईंदर पश्चिमेच्या मोर्वा गावातील सरकारी जागा हडप करणाऱ्या आणि कांदळवन तोडून बांधकाम करणाऱ्या तिघा माफियांविरोधात भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिकेने हा गुन्हा दाखल केला असून या ठिकाणी केलेले बांधकामसुद्धा तोडण्यात आले आहे. लोकमतने बुधवारीच मोर्वा, राई, मुर्धा भागात सरकारी जमिनींवरील कांदळवन तोडून बांधकामे होत असल्याचे वृत्त दिले होते.
मोर्वा गावात खाडी किनारी असलेल्या बामण देव नगर भागात सरकारी जागा असुन काही माफिया प्रवृत्ती सरकारी जागा बळकावून त्यावर बांधकामे करून विक्री वा भाड्याने देण्याचे प्रकार करतात. त्यासाठी येथील मोठमोठी कांदळवनाची झाडे तोडली जातात. झाडे तोडून तेथे भराव करुन बांधकामे केली जातात.
बामणदेव नगर येथे कांदळवन तोडुन भराव करुन खोल्या बांधण्यासाठी पायाचे बांधकाम केल्या प्रकरणी भूमाफिया पिंटु सिंगसह जयवंत किणी आणि जितेंद्र किणी यांच्या विरोधात भाईंदर पोलीस ठाण्यात विविध कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभाग अधिकारी सुनील यादव यांनी सदर गुन्हा दाखल केला असून यादव यांनी पालिका पथकासह सदर पायाचे बांधकाम देखील तोडून टाकले आहे. आयुक्त बालाजी खतगावकर यांच्या आदेशानंतर प्रभाग अधिकाऱ्यांनी कारवाई केली.