यूएलसी घोटाळा दाबणाऱ्या पोलीस, महसूल अधिकाऱ्यांची चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:42 AM2021-07-28T04:42:33+5:302021-07-28T04:42:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मीरा रोड : बनावट यूएलसी प्रमाणपत्र घोटाळा चार वर्षांपूर्वी उघड झाला तेव्हा मृत सच्चिदानंद पावसकर यांना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड : बनावट यूएलसी प्रमाणपत्र घोटाळा चार वर्षांपूर्वी उघड झाला तेव्हा मृत सच्चिदानंद पावसकर यांना आरोपी करून मुख्य आरोपींना वाचवण्याकरिता प्रयत्न केलेल्या पोलीस व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची चौकशी सुरू झाली आहे. परिणामी बड्या राजकीय नेत्यांबरोबरच वरिष्ठ अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील नागरी संकुलन विभागाचे सहाय्यक नगररचनाकार धैर्यशील पाटील यांनी १७ एप्रिल २०१७ रोजी मीरा रोड पोलीस ठाण्यात फिर्याद देऊन यूएलसी घोटाळ्याचा गुन्हा नोंदवला होता. त्यामध्ये मीरा रोडच्या कनकिया भागात असलेल्या मौजे नवघर सर्व्हे क्रमांक २६७/१ मधील १३९८ चौ.मी. इतके क्षेत्र हे नागरी कमाल जमीन धारणा कायद्यानुसार अतिरिक्त ठरते. कलम २० खाली सदर ठिकाणी आर्थिक दुर्बल घटकांसाठी ४० चौ.मी. क्षेत्रफळाच्या ४० सदनिका बांधणे व त्यातील दोन सदनिका शासनास देणे बंधनकारक होते. तसे असताना सच्चिदानंद पावसकर यांनी ही जमीन राहुल एज्युकेशन सोसायटीला विकली. सध्या तेथे अभियांत्रिकी महाविद्यालय उभे आहे. पावसकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला गेला.
फिर्यादीत राहुल एज्युकेशन सोसायटीच्या पत्राचा संदर्भ देऊन सदर जमीन संस्थेने पावसकर यांच्याकडून खरेदी केली व जमीन खरेदी करणारे संस्थेचे राहुल तिवारी आदींना आरोपी बनवले नव्हते. पावसकर हे २०११ सालीच मरण पावले असल्याने तत्कालीन पोलीस निरीक्षक जगदीश शिंदे यांनी महिनाभरात गुन्हा दप्तरी दाखल केला.
भाजपचे माजी नगरसेवक संजय पांगे, मीरारोड येथील जागरूक नागरिक राजू गोयल यांनी मात्र यूएलसी घोटाळ्याचा गुन्हा दप्तरी दाखल करणे हाच एक घोटाळा असल्याचा आरोप केला आहे. गुन्ह्यातील मुख्य आरोपीना वाचवण्यासाठी संगनमताने हे केल्याचा त्यांचा दावा आहे.
...........
या प्रकरणी गोयल व पांगे यांच्या तक्रारी आल्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला आहे. संबंधित विभागांकडे पत्रव्यवहार केला आहे.
- शैलेंद्र नगरकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मीरारोड
........
वाचली