उल्हासनगरमध्ये पोलिसांमुळे वाचला आत्महत्या करणाऱ्या तरुणाचा जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2018 12:09 PM2018-08-01T12:09:07+5:302018-08-01T12:15:40+5:30
संपत्तीच्या वादातून गळफास घेणाऱ्या विवाहित तरुणाला पेट्रोलिंग पोलिसांमुळे जीवनदान मिळाले आहे.
उल्हासनगर : संपत्तीच्या वादातून गळफास घेणाऱ्या विवाहित तरुणाला पेट्रोलिंग पोलिसांमुळे जीवनदान मिळाले आहे. उल्हासनगरमधील चिंचपाडा साईनाथ कॉलनी येथे ही घटना घडली. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साईनाथ कॉलनी परिसरात सोमवारी सकाळी 11 वाजता बिट नंबर 1 चे पोलीस नाईक एस. एन. मुटे व शिपाई भैयासाहेब अहिरे पेट्रोलिंग करत होते. त्याचदरम्यान एक तरुण आत्महत्या करत असल्याची माहिती मिळाली.
पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस परिसरात दाखल झाले. त्याचवेळी आनंद नावाचा एक विवाहीत तरुण आत्महत्या करताना दिसला. घराचा दरवाजा बंद असल्याने पोलिसांनी त्याला दरवाजा उघडण्याची विनंती केली. मात्र काहीच प्रतिसाद न मिळाल्याने पोलिसांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. गळफास घेण्याच्या तयारीत असलेल्या आनंदची पोलिसांनी समजूत काढल्याने अनर्थ टळला.
विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांच्या सतर्कतेमुळे एका तरुणाचा जीव वाचला. आनंद तिवारी असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. कुटुंबाच्या संपत्तीच्या वादातून हा प्रकार झाल्याची माहिती तरुणाने पोलिसांना दिली. पोलीस नाईक एस. एन. मुटे व पोलीस शिपाई भैयासाहेब अहिरे यांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.