दारूच्या नशेत आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यास पोलिसांनी वाचवले

By जितेंद्र कालेकर | Published: August 12, 2018 10:31 PM2018-08-12T22:31:29+5:302018-08-12T22:37:37+5:30

ठाण्यातील वर्तकनगर येथील एका इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील गच्चीवरुन दारुच्या नशेत उडी मारण्याच्या बेतात असलेल्या सुरेश गोडेराव याला वर्तकनगर पोलिसांच्या दोन बीट मार्शलनी वाचविल्याची घटना रविवारी घडली.

Police saved who attempted suicide | दारूच्या नशेत आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यास पोलिसांनी वाचवले

इमारतीच्या गच्चीवरुन मारणार होता उडी

googlenewsNext
ठळक मुद्देठाण्याच्या वर्तकनगरातील घटनाइमारतीच्या गच्चीवरुन मारणार होता उडीदोन बीट मार्शलने घेतली धाव

ठाणे : दारूच्या नशेत वर्तकनगर येथील एका इमारतीच्या गच्चीवरून रविवारी दुपारी आत्महत्येचा प्रयत्न करण्याच्या बेतात असलेल्या सुरेश भास्कर गोडेराव (३४, रा. भीमनगर, ठाणे) याला वर्तकनगर पोलिसांनी वेळीच मध्यस्थी करून वाचवले. त्याने आत्महत्येचा प्रयत्न का केला, हे मात्र समजू शकले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
एका इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी किरकोळ काम करणारा सुरेश वर्तकनगरनाक्यावरील ‘माळवे हाउस’ या सहा मजली इमारतीमध्ये आत्महत्या करण्यासाठी १२ आॅगस्ट रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास शिरला. तसे त्याने गेटवरच एका रहिवाशाला सांगितले. ही माहिती मिळताच काही रहिवाशांनी ठाणे शहर पोलीस नियंत्रण कक्षाला ही माहिती दिली. नियंत्रण कक्षातून वर्तकनगर पोलिसांना ही माहिती देण्यात आली. तत्पूर्वी, वर्तकनगर बीट क्रमांक-१ चे पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप अलगुडे आणि नवनाथ ढाकणे यांना हा प्रकार काही नागरिकांनी सांगितला. वर्तकनगर पोलीस चौकीपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या या इमारतीकडे क्षणाचाही विलंब न करता या दोघांनीही धाव घेतली. त्यावेळी इमारतीच्या खालून अनेकजण त्याला ‘मागे हो, उडी टाकू नको’, असे सांगून आत्महत्या करण्यापासून परावृत्त करत होते. तोपर्यंत अलगुडे आणि ढाकणे यांनी गच्चीवर जाऊन सुरेशला ताब्यात घेतले. त्याने सुरुवातीला नाव आणि पत्ता सांगण्यासही नकार दिला. तासाभराने त्याने स्वत:ची आणि कुटुंबाची माहिती दिल्यानंतर दुपारी ३ वा.च्या सुमारास त्याची आई जनाबाई आणि मोठा भाऊ नारायण गोडेराव यांच्या ताब्यात त्याला देण्यात आले. पोलिसांच्या तत्परतेमुळे त्याचे प्राण वाचल्याने त्याच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले. कोणताही वाद नसताना त्याने असे का पाऊल उचलले, याबाबत कुटुंबीयांनीही आश्चर्य व्यक्त केले.
................................
 

Web Title: Police saved who attempted suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.