दिल्ली येथून बेपत्ता झालेल्या मुलीचा ठाणे पोलिसांनी घेतला शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 05:59 AM2019-09-20T05:59:04+5:302019-09-20T05:59:11+5:30
वर्षभरापूर्वी बेपत्ता झालेल्या एका १६ वर्षीय मुलीचा छडा लावण्यात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ च्या पथकाला यश आले आहे.
ठाणे : दिल्लीतील मनियारी नरेला भागातील राजीव कॉलनी येथून वर्षभरापूर्वी बेपत्ता झालेल्या एका १६ वर्षीय मुलीचा छडा लावण्यात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ च्या पथकाला यश आले आहे. या मुलीची ओळख पटवल्यानंतर तिला मंगळवारी आईवडिलांच्या ताब्यात दिले.
ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील हरविलेल्या तसेच अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलामुलींचा शोध घेऊन त्यांना पालकांच्या ताब्यात देण्याचे आदेश ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी अलीकडेच दिले होते. महिला पोलीस शिपाई माधुरी जाधव, तेजश्री शेळके यांनी कल्याणच्या मुरबाड रोडवरील नवज्योत ट्रस्ट या संस्थेत जाऊन संचालकांकडे चौकशी केली. दिल्ली येथील १६ वर्षीय मुलगी या संस्थेत दाखल असल्याची माहिती त्यांना मिळाली. सुरुवातीला या मुलीकडे चौकशी केल्यानंतर तिने माहिती दिली नाही. मात्र विश्वासात घेतल्यावर जुलै २०१८ मध्ये दिल्लीच्या राजीव कॉलनी येथून घरातील कोणालाही न सांगता निघून आल्याची कबुली तिने दिली. तिला सामाजिक कार्यकर्त्याने उल्हासनगरच्या बालकल्याण समितीच्या आदेशाने भिवंडीतील सनराइज हॅप्पीहोम बालसुधारगृहात जुलै २०१८ मध्ये दाखल केले होते.
गेल्या सहा महिन्यांपासून तिला मुरबाडच्या नवज्योत ट्रस्ट येथे ठेवले होते. तिने दिलेल्या माहितीच्या आधारे दिल्ली पोलिसांशी संपर्क साधला असता, ९ जुलै २०१८ रोजी नरेला (दिल्ली) पोलीस ठाण्यात तिच्या अपहरणाचा गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली. तिच्या आईवडिलांशीही संपर्क साधून ओळख पटवली. त्यानंतर, १७ सप्टेंबर २०१९ रोजी तिला तिचे आईवडील तसेच सामाजिक संस्थेच्या ताब्यात ुदिले. गोपनीयतेच्या कारणास्तव या मुलीचे नाव जाहीर करण्यात आले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
>या मुलीकडे चौकशी केल्यानंतर तिने कोणतीही माहिती दिली नाही. महिला पोलिसांनी तिची दोन, तीनवेळा भेट घेऊन तिला विश्वासात घेतले. तेव्हा आईवडील आपल्यापेक्षा धाकट्या भावाला जास्त जीव लावतात, असा समज झाल्याने तिने घरातून निघून जाण्याचे पाऊल उचलल्याचेही तिने सांगितले.