ठाण्याच्या देसाईतील दारू अड्ड्यावरील धाडीत लाखाचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 10:44 PM2020-01-13T22:44:59+5:302020-01-13T22:50:23+5:30
मोठी देसाई भागातील खाडीकिनारी असलेल्या कांदळवनाच्या दलदलीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दारूनिर्मिती सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे रविवारी डायघर पोलिसांनी या भागात धाडसत्र राबवून दारु निर्मितीसाठी लागणारे रसायन नष्ट केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : देसाई भागातील खाडीकिनारी असलेल्या मद्यनिर्मिती अड्ड्यावर धाड टाकून विष्णूशंकर रामलाल पासवान (२०, रा.मोठी देसाई, जि. ठाणे) याला शीळ- डायघर पोलिसांनी रविवारी अटक केली. त्याच्याकडून दारूनिर्मितीसाठी लागणाऱ्या रसायनासह एक लाख एक हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मोठी देसाई भागातील खाडीकिनारी असलेल्या कांदळवनाच्या दलदलीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दारूनिर्मिती सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांना मिळाली होती. त्याआधारे पोलीस उपनिरीक्षक विकास राठोड, पोलीस हवालदार प्रकाश शिरसाठ, मारुती कदम, पोलीस नाईक दीपक जाधव, मुकुंद आव्हाड, ललित वाकडे तसेच पोलीस कॉन्स्टेबल धनंजय आहेर आणि गणेश सपकाळे आदींच्या पथकाने १२ जानेवारी रोजी या भागात धाड टाकून ४८ प्लास्टिकचे ड्रम आणि त्यामध्ये दारूनिर्मितीसाठी लागणारे रसायन (वॉश) तसेच इतर सामग्री हस्तगत केली. घटनास्थळी मिळालेले रसायन पोलिसांनी नष्ट केले. याप्रकरणी शीळ-डायघर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५-ई आणि फ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. दारूनिर्मिती करणा-या पासवान याची जामिनावर सुटका झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.