मोबाइलची जबरी चोरी करणाऱ्यास नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 10:02 PM2020-01-20T22:02:33+5:302020-01-20T22:06:59+5:30
रिक्षाचालकाच्या हातातील मोबाइल जबरीने हिसकावून पळणा-या किरण विरम (२२) याला काही दक्ष नागरिकांनी पकडून चांगलाच चोप दिल्याची घटना रविवारी दुपारी घडली. त्याच्याविरुद्ध मोबाइल चोरीचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नौपाडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : रिक्षात बसून मोबाइलवरील गाणी ऐकत असलेल्या बिरमल शिंदे (३४, रा. मुलूंड, मुंबई) या रिक्षाचालकाच्या हातातील मोबाइल जबरीने हिसकावून पळणा-या किरण कालीदास विरम (२२, रा. भिमनगर, ठाणे) याला काही दक्ष नागरिकांनी पकडून चांगलाच चोप दिल्याची घटना रविवारी दुपारी घडली. त्याला नौपाडा पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतर त्याच्याविरुद्ध मोबाइल चोरीचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
नौपाडा येथील भक्ती मंदिर रोडवर १९ जानेवारी रोजी दुपारी २.४५ वाजण्याच्या सुमारास शिंदे हे रिक्षा चालक आपल्याच रिक्षामध्ये मागील सिटवर बसून प्रवाशांची वाट पाहात होते. त्याचवेळी एका मोटारसायकलीवरून तिथे आलेल्या किरण विरम हा त्याचा साथीदार विजय याच्यासह तिथे आला. या दोघांपैकी मागे बसलेल्या किरण याने त्याचा मोबाइल जबरीने हिसकावण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात येताच शिंदे यांनी त्याचा काही अंतर पाठलागही केला. मात्र, आरडाओरडा झाल्याने किरणचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. त्याचवेळी पाठलाग करणा-या शिंदे यांनी मोठ्या धाडसाने त्याला स्कूटरवरून खाली खेचल्यामुळे तो खाली पडला. या दरम्यान, तिथे जमलेल्या नागरिकांनी त्याला पकडून चांगलाच प्रसाद दिला. नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद लबडे आणि मोहिनी कपिले यांच्या पथकाने त्याला रविवारी अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध चोरीचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून त्याला याप्रकरणात अटक केली आहे. त्याच्या अन्य एका साथीदाराचा शोध घेण्यात येत असून त्याने आणखीही अशा प्रकारे जबरी चोरीचे गुन्हे केले आहेत का? याचा तपास करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.