पोलिसांनाही स्वत:ला घडवता आले पाहिजे - पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे
By जितेंद्र कालेकर | Published: January 9, 2024 12:02 AM2024-01-09T00:02:13+5:302024-01-09T00:02:24+5:30
ठाणे, भिवंडीतील ८९४ तक्रारदारांना मिळाला नऊ कोटी ३५ लाखांचा मुद्देमाल
ठाणे : चित्रपट, मालिकांमधील कथानकांसह विविध कारणांनी पोलिसांबद्दलचे मत नकारात्मक होते. जेंव्हा खऱ्या बाजूने पोलिस उभे राहतात, हे पटते तेंव्हा नागरिकांमध्ये पोलिसांबद्दलचा दृष्टीकोन बदलतो, असे प्रतिपादन ठाण्याचे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी सोमवारी केले. ठाणे आणि भिवंडीतील ८९४ फिर्यादींना चोरीस गेलेला नऊ कोटी ३५ लाख ३८ हजारांचा मुद्देमाल आयुक्तांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
ठाण्यातील डॉ. काशीनाथ घाणेकर नाटयगृहाच्या सभागृहात महाराष्ट्र पोलिस वर्धापन दिनानिमित्त पश्चिम प्रादेशिक विभागातील ठाणे, वागळे इस्टेट आणि भिवंडी या तीन परिमंडळातील तक्रारदारांच्या चोरी, दरोडा, जबरी चोरीतील मुद्देमालाचे अभिहस्तांतरण झाले. त्यावेळी मार्गदर्शन करतांना ते पुढे म्हणाले, ब्रिटीश काळात सत्तेला मदत करण्यासाठी आणि नागरिकांना दाबून ठेवण्यासाठी पोलिसांचा उपयोग केला जात असे. साधारण १९८० नंतर पोलिसांनी जनतेचा भाग असले पाहिजे. जनतेच्या सेवेसाठी असले पाहिजे, ही धारणा पुढे आली. त्यादृष्टीने पोलिसांमध्ये बदल झाले. परंतू, पोलिस कोठडीतील मृत्यू, वाहतूक पोलिसाने दंडापोटी घेतलेले पैसे किंवा चित्रपट मालिकांमधील दाखवले जाणारे पोलिसांचे चित्र यामुळे पोलिसांबद्दलचे मत नागरिकांमध्ये नकारात्मक होते.
पोलिस खात्यात येण्यापूर्वी आपलाही पोलिसांशी कधी संपर्क नव्हता. त्यामुळे आपलीही तशीच भावना होती. परंतू, पोलिस ठाण्यात आलेल्या दाेघांपैकी एक बाजू नाराज होते. परंतू, ,खऱ्या बाजूने पाेलिस उभे राहतात,मदत करतात, हे जेंव्हा समजते. तेंव्हा नागरिकांचे पोलिसांबद्दलचे मत बदलते. महिला,विद्याथीर् आणि जेष्ठ नागरिक यांना पोलिसांची कशी मदत हवी आहे, याचाही विचार झाला पाहिजे, नागरिकांनी पोलिसांना मदत केली पाहिजे आणि पोलिसांनाही स्वतत:ला घडवता आले पाहिजे, असेही ते म्हणाले.
यावेळी एक कोटी सात लाख ८९ हजार ९०६ इतकी रोकड, दोन कोटी २० लाख २० हजार ५४७ रुपयांचे दागिने, १५ लाख दोन हजारांचे मोबाईल फोन, दोन कोटी ९७ लाख ५० हजारांची वाहने, गहाळ झालेले एक कोटी ५७ लाख ८५ हजारांचे मोबाईल आणि २८ लाख १८ हजार ९२९ रुपयांच्या इलेक्ट्रीक वस्तू तसेच इतर एक कोटी आठ लाख ७१ हजारांचा ऐवज असा नऊ कोटी ३५ लाख ३८ हजार ४४५ रुपयांचा मुद्देमाल फिर्यादींना आयुक्तांच्या हस्ते परत केला. यावेळी नागरिकांनी पोलिसांच्या प्रती समाधान व्यक्त केले.यावेळी सह पोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे, अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. पंजाब उगले, पश्चिम प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त महेश पाटील, उपायुक्त गणेश गावडे, नवनाथ ढवळे आणि अमरसिंह जाधव यांच्यासह नागरिक तसेच पोलिस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.