पोलिसांनी डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या खूनातील सूत्रधारापर्यंत जाणे अपेक्षित आहे- मुक्ता दाभोळकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 10:22 PM2018-08-22T22:22:46+5:302018-08-22T22:32:07+5:30
डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येतील केवळ मारेकऱ्यांना न पकडता मुख्य सूत्रधार तथा यातील मास्टर मार्इंडपर्यंत पोलिसांनी पोहचणे अपेक्षित असल्याचे मत अंधश्रद्ध निर्मूलन समितीच्या मुक्ता दाभोळकर यांनी ठाण्यात व्यक्त केले.
ठाणे: केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग तसेच पोलीस यंत्रणांनी डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येतील केवळ मारेकºयांना न पकडता मुख्य सूत्रधार तथा यातील मास्टर मार्इंडपर्यंत पोहचणे अपेक्षित आहे. तेंव्हाच हा तपास पूर्ण होईल. आधीच हा तपास वेगाने झाला असता तर डॉ. दाभोळकर यांच्यानंतर झालेल्या तीन हत्याही सरकारला रोखता आल्या असत्या, अशी खंत अंधश्र्रद्धा निर्मूलन समितीच्या मुक्ता दाभोळकर यांनी ठाण्यात व्यक्त केली.
ठाण्यातील मो. ह. विद्यालयात डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मरणाच्या औचित्याने कोकण मराठी साहित्य परिषद, युवाशक्ती, मुंबई- ठाणे आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, ठाणे जिल्हा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाला प्रमुख पाहुण्या म्हणून त्या उपस्थित होत्या. ‘विवेकवादी चळवळीत हवी तरुणांची साथ’ या विषयावर त्यांनी विद्यार्थ्यांशी मोकळेपणाने संवाद साधला. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलतांना त्यांनी वरील मत व्यक्त केले. डॉ. दाभोलकर यांच्यासह एम.एम. कलबुर्गी, गोविंद पानसरे, गौरी लंकेश या चारही हत्यांमध्ये केवळ साधर्म्य नसून एकमेकांची लिंक आहे. १८ आॅगस्ट रोजी तब्बल अडीच वर्षांच्या गॅपनंतर डॉ. दाभोळकर यांच्या खूनातील पहिली अटक झाली. केवळ यातील मारेकºयांना अटक नको तर मास्टरमार्इंडपर्यंत पोलीस यंत्रणांनी जाणे अपेक्षित आहे. या संपूर्ण तपासावर उच्च न्यायालयाचे नियंत्रण आणि लक्ष होते, आहे. म्हणूनच हे आरोपी पकडले गेले. इतक्या गंभीर खूनातील मारेकरी इतके दिवस बाहेर राहणे म्हणजे काहीतरी त्याला मोठे पाठबळ आहे, त्याशिवाय तो मोकाट राहूच शकत नाही, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. अगदी अलिकडेच डॉक्टरांच्या पाचव्या स्मृतीदिनाच्या कार्यक्रमात तुषार गांधी यांनी पुण्यात अमेरिकेचा एक प्रकार सांगितला होता. अमेरिकेतही अशाच प्रकारची हत्या झाली होती. तेथील सरकारने अशी हत्या करणाºया व्यक्ती आणि त्यांच्या संघटनेवरही गुन्हे दाखल केले. त्यानंतर दिवाळखोरीत येऊन ती संघटनाही संपली. भारत सरकारनेही जी माणसे संघटीतरित्या असा हिंसक विचार वाढवायला मदत देतायत त्यांच्याबाबतीत त्यांनी भूमीका घेतली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. जोपर्यंत मुख्य सूत्रधार पकडले जात नाहीत, तोपर्यंत हा तपास पूर्ण होणार नाही, असेही त्या म्हणाल्या. यापुढे तरी तपासात दिरंगाई होणार नाही, तो वेगाने होईल, हे सरकारने पाहिजे पाहिजे, तरच यापुढेही अशा प्रकारच्या हत्या रोखण्यात येतील, असेही त्या म्हणाल्या. संघटीत गुन्हेगारी
तत्पूर्वी, विवेकवादाच्या विषयावर त्यांनी व्यापक विचार मांडून तरुणांनी अंधश्रद्धा निर्मूलनासारख्या चळवळीकडे लक्ष दिले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. देव, धर्माला अंनिसचा विरोध नसून त्या नावाखाली चालणाºया शोषणाला विरोध असल्याचे त्या म्हणाल्या.
२५ वर्षापूर्वी कोल्हापूरच्या रंकाळा तलाव इथे गणेश मूर्ती दान करण्यासाठी आवाहन केले होते. त्यावेळी पहिल्या वर्षी १०० मूर्ती कृत्रित तलावात विसर्जित झाल्या. आता हे काम अंनिसला करावे लागत नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. नाशिकमध्ये दोन लाख ६० हजार मूर्त्या लोकांनी दान केल्या. हे याच चळवळीचे मोठे यश आहे.
विवेकवादी माणसाचे मत निर्भय असते. पूजेच्या नावाखाली ठाणे, डोंबिवलीतही काही महिलांवर भोंदू बाबांनी कसे अत्याचार केले. याचाही त्यांनी समाचार घेतला. अंधश्रद्धेच्या नावाने होणारे शोषण थांबविण्यासाठी पोलीस किंवा अंनिसच्या कार्यकर्त्याना कळवा, असे आवाहनही त्यांनी केले. दाभोळकर यांच्या हत्येनंतर अंधश्रद्धा निर्मूलन कायदा झाला, यात ४०० गुन्हे नोंदविले गेल्याचेही त्या म्हणाल्या. सामाजिक बहिष्कार कायदाही अंमलात आला. यात २५ केसेस दाखल झाल्या. दाभोळकरांच्या हत्येपूर्वी अंनिसच्या २१५ शाखा होत्या. त्या आता३२५ झाल्या आहेत. ही चळवळ उभी करण्यामध्ये त्यांच्या सहकाºयांचीही मेहनत कामी आली. रुढी परंपरेचेही सर्वच वाईट आहे, असे नाही. परंपरेमध्ये जे चांगले आहे, जे बुद्धीला पटते. काळाच्या कसोटीवर टिकते, तेच करावे, दाभोळकर म्हणाल्या.
यावेळी वक्तृत्व स्पर्धेतील अनिकेत पाळसे, किशोर शेट्टी, नम्रता गोडांबे, लक्ष्मण कचरे, मैत्रेयी भारती, सौंदर्या कांबळे, दर्शन गायकवाड, अमन सरगर आणि अमय वायंगणकर या यशस्वी विद्यार्थ्यांचा मुक्ता दाभोळकर यांच्या हस्ते पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला.