दंगेखोरांच्या धुडगूस नंतर मीरा - भाईंदरमध्ये पोलिसांचे शक्ती प्रदर्शन; अटक १३ पैकी ९ आरोपीना पोलीस कोठडी

By धीरज परब | Published: January 24, 2024 11:59 AM2024-01-24T11:59:05+5:302024-01-24T11:59:21+5:30

फेसबुकवर धमकीवजा पोस्ट टाकणाऱ्यास २ दिवसांची कोठडी मिळाली आहे .

Police show of force in Meera - Bhayander after rioters' dhudgoos | दंगेखोरांच्या धुडगूस नंतर मीरा - भाईंदरमध्ये पोलिसांचे शक्ती प्रदर्शन; अटक १३ पैकी ९ आरोपीना पोलीस कोठडी

दंगेखोरांच्या धुडगूस नंतर मीरा - भाईंदरमध्ये पोलिसांचे शक्ती प्रदर्शन; अटक १३ पैकी ९ आरोपीना पोलीस कोठडी

मीरारोड - मीरारोडच्या नया नगर भागात गाड्यांवर श्रीरामाच्या प्रतिकृतीचे झेंडे लावून एका धार्मिक स्थळा जवळ श्रीरामाच्या घोषणा देणाऱ्या वाहनांवर हल्ला चढवत तोडफोड , मारझोड केल्याच्या रविवार रात्रीच्या घटने प्रकरणी नया नगर पोलिसांनी अटक केलेल्या ८ आरोपीना ५ दिवसांची पोलीस कोठडी तर ४ अल्पवयीन आरोपीना बालसुधारगृहात ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले . फेसबुकवर धमकीवजा पोस्ट टाकणाऱ्यास २ दिवसांची कोठडी मिळाली आहे . भाईंदर मध्ये चिकनशॉप तोडफोड व एका दुचाकीस्वारास मारहाण प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यांना दोन दिवस पोलीस कोठडी मिळाली आहे . शहरातील विविध भागात तोडफोड मारहाणीच्या घटना घडल्या असून नया नगर पोलीस ठाण्यात ३ , भाईंदर पोलीस ठाण्यात २ तर काशीमीरा पोलीस ठाण्यात १ असे एकूण ६ गुन्हे दाखल असून त्यात वाढ होण्याची शक्यता आहे . मंगळवारी शहरात पोलिसांनी शक्ती प्रदर्शन केले असून शहरात तणावपूर्ण शांतता आहे . 

अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या उत्साहात व आनंदात सर्व असताना रविवारी रात्री साडे दहाच्या सुमारास भाईंदर पश्चिमेस मॅक्सस मॉल परिसर व भोला नगर भागात राहणारे ४ चारचाकी व १० दुचाकी गाड्यां वर श्रीरामाचे भगवे झेंडे लावून न्याय नगर मध्ये घोषणा देत फिरत होते . अल्पसंख्यांक गटाच्या मशिदी जवळ घोषणा देण्यावरून वाद सुरु झाला व सुमारे ५० ते ६० जणांच्या जमावाने हल्ला चढवत गाड्यांची, झेंड्यांची तोडफोड व लोकांना मारहाण केली . त्यात महिला , मुलं सुद्धा किरकोळ जखमी झाली. नया नगर पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्यासह विविध कलमां  खाली जमावावर गुन्हा दाखल करून १२ जणांना पकडले . त्यात ४ जण अल्पवयीन असल्याने मंगळवारी ठाणे न्यायालयाने त्यांना बालसुधारगृहात तर उर्वरित ८ जणांना ५ दिवसांची पोलीस कोठडी दिली . ह्या घटनेचे व्हिडीओ व्हायरल झाल्या नंतर फेसबुकवर धमकीवजा पोस्ट टाकणाऱ्या अबू शेख विरुद्ध नया नगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली . त्याला मंगळवारी ठाणे न्यायालयाने  २ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे .   

सोमवारी नया नगर पोलीस ठाण्यावर एका गटाने मोठ्या जमावाने घेराव घातला .  जे हल्लेखोर असतील त्यांना अटक करा पण ज्यांनी जाणीवपूर्वक रात्री उशिरा येऊन धार्मिक स्थळ परिसरात घोषणाबाजी केली त्यांच्यावर पण गुन्हा दाखल करा अशी मागणी चालवली होती . रमझान महिन्यात देखील काही हिंदुत्त्ववादी लोकांनी जाणीवपूर्वक धार्मिक स्थळा बाहेर घोषणाबाजी केल्याचे जमावातून सांगण्यात आले . जमलेल्या जमावाला काँग्रेसचे माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांनी समजावून शांत केले .  ९१ -  ९२ च्या दंगलीत देखील मीरा भाईंदर मध्ये साधा दगड भिरकावला गेला नाही याची आठवण करून देत आपण सर्व धर्मीय इतकी वर्ष एकत्र रहात आहोत . हे आपले शार असून त्याची काळजी आपण घेतली पाहिजे असे मुझफ्फर म्हणाले . 

आमदार प्रताप सरनाईक यांनी  पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय यांची भेट घेऊन शहरात सर्व धर्मीय एकोप्याने रहात असताना  रामभक्तांवर हल्ला करणाऱ्यांची सखोल चौकशी करा, सर्व हल्लेखोरांना अटक करा अन्यथा मीरा भाईंदर बंद ची हाक द्यावी लागेल असा इशारा दिला . दरम्यान सोमवारी नया नगरच्या वेशीवर भाईंदर उड्डाणपूल जवळ व ररेल्वे समांतर रस्त्यावर हिंदुत्त्ववादी संघटनांचा जमाव मोठ्या संख्येने जमला . त्यांनी रिक्षाची तोडफोड केली . यावेळी दोन्ही गटात दगडफेक झाल्याने त्यात काहीजण जखमी झाले . पोलिसांनी लाठीचा मार देत दोन्ही गटाला पिटाळून लावले . या प्रकरणी नया नगर पोलिसांनी सुमारे २०० ते ३०० जणांवर गुन्हा दाखल केला आहे . 

हल्ल्याचे पडसाद शहरातील अनेक भागात उमटले . मीरारोडच्या ओमशांती चौक जवळ एका चषमा दुकानदारास एका टोळक्याने जय श्रीराम म्हणण्यास बळजबरी करून मारहाण व दुकानाची तोडफोड केली म्हणून काशीमीरा पोलिसांनी अनोळखी ५ ते ६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे . भाईंदरच्या गणेशदेवल नगर भागात दोन चिकन शॉपची तोडफोड तर महापालिके जवळ एका दुचाकी स्वारास अडवून मारहाण केल्या प्रकरणी भाईंदर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे . त्यांना ठाणे न्यायालयाने मंगळवारी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे . तर एका कारच्या तोडफोडीचा दुसरा गुन्हा भाईंदर मध्ये दाखल आहे. या शिवाय शहरात काही मारहाण - तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत .  

आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकारी व पोलीस कर्मचारी यांना सोमवारी रात्री पर्यंत नया नगर भागात बंदोबस्तासाठी ठेवले होते . मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयातील सुमारे ५०० ते ६०० अधिकारी व कमर्चाऱ्यांसह रॅपिड एक्शन फोर्सचे २५० जवान , एसआरपीएफच्या ४ तुकड्या यांचा बंदोबस्त मंगळवारी ठेवण्यात आला . यावेळी पोलिसांनी मोठ्या संख्येने शस्त्रांसह लॉंगमार्च काढत शक्ती प्रदर्शन केले . मुंबई , पालघर व ठाणे ग्रामीण भागातून देखील पोलीस कुमक आली होती . अपर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक , उपायुक्त जयंत बजबळे , सहायक आयुक्त महेश तरडे , नया नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सुपे आदींसह पोलीस अधिकारी व पोलिसांनी परिसरात तळ ठोकत परिस्थिती नियंत्रणात आणली . शहरात दोन्ही गटांना शांततेचे आवाहन पोलिसांनी केले असून दंगा करणारे , अफवा , आक्षेपार्ह्य पोस्ट व्हायरल केल्यास कठोर कारवाईचा इशारा दिला आहे . 

Web Title: Police show of force in Meera - Bhayander after rioters' dhudgoos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.