उल्हासनगरातील ननावरे पतिपत्नी आत्महत्या प्रकरणी पोलिस पथके फलटणात
By सदानंद नाईक | Published: August 8, 2023 06:37 PM2023-08-08T18:37:37+5:302023-08-08T18:38:29+5:30
उल्हासनगर कॅम्प नं-४ आशेळेगाव पाड्यात राहणाऱ्या नंदू ननावरे यांनी गेल्या आठवड्यात पत्नीसह घराच्या छतावरून आत्महत्या केली.
सदानंद नाईक, उल्हासनगर : नंदू ननावरे पतीपत्नी आत्महत्या प्रकरणी नातेवाईकांनी आरोपीवर कारवाई करण्याची मागणी केल्यावर, विठ्ठलवाडी पोलीस पथकाने फलटण गाठून मुख्य आरोपी संग्राम निकाळजे यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तसेच नातेवाईकांच्या उपस्थित शहरातील घराची झाडाझडती घेतली एक चिट्टी व आत्महत्या प्रकरणीचा पेन ड्राइव्ह पोलिसांना मिळाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी दिली आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-४ आशेळेगाव पाड्यात राहणाऱ्या नंदू ननावरे यांनी गेल्या आठवड्यात पत्नीसह घराच्या छतावरून आत्महत्या केली. आत्महत्यांपूर्वी पतीपत्नीने एक व्हिडिओ बनवून वरिष्ठ पोलीस अधिकारी, जवळचे नातेवाईक व राजकीय नेत्यांना पाठविला होता. व्हिडीओ मध्ये पतीपत्नीने फलटण येथील संग्राम निकाळजे, रणजितसिंह नाईक निंबाळकर व देशमुख बंधूंचा उल्लेख केला होता. तसेच यातील आरोपी निकाळजे याने अंबरनाथ मध्ये येऊन, अनेक नेत्यांच्या भेटा घेतल्याचे म्हटले होते. दोन दिवसांपूर्वी मृत नंदू ननावरे यांचा भावासह इतर नातेवाईकांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात जाऊन ननावरे पतीपत्नी आत्महत्या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली होती.
त्यानंतर पोलीस सूत्र हलुन फलटण येथे पोलिस पथकाने संग्राम निकाळजे यांचा शोध घेतला. मात्र तो पोलिसांना मिळून आला नाही. तसेच ननावरे यांच्या राहत्या घराची नातेवाईकांसमोर झाडाझडती घेतली असता, आत्महत्या करण्यापूर्वी व्हायरल झालेल्या व्हिडीओचा पेनड्राइव्ह व एक चिट्ठी मिळाली आहे. विठ्ठलवाडी पोलीस ननावरे पतिपत्नी आत्महत्या प्रकरणी चौकशी करीत असून पोलीस तपासणीत पुरावा मिळाल्यावर कोणाचीही हयगय करणार नाही. अशी प्रतिक्रिया वरिष्ठ पोलीस निरीक्षक व तपास अधिकारी संजय गायकवाड यांनी दिली. मृत नंदू ननावरे हे माजी आमदार पप्पु कलानी व ज्योती कलानी यांचे खाजगी स्वीयसहायक राहिले असून कलानी व आमदार किणीकर यांचे मंत्रालयातील कामे करीत असल्याचे बोलले जाते. त्यांचे अनेक आमदार सोबत जवळचे संबंध राहिल्याने, पतिपत्नी आत्महत्या सर्व सामान्य नागरिकांना उत्सुकता लागून राहिली आहे.