समुद्र दाम्पत्याला पोलीस कोठडी
By admin | Published: June 4, 2017 05:08 AM2017-06-04T05:08:31+5:302017-06-04T05:08:31+5:30
चार हजारांहून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या सागर इन्व्हेस्टमेंटच्या समुद्र दाम्प्त्याला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांना शनिवारी कल्याण
- लोकमत न्यूज नेटवर्क
बदलापूर : चार हजारांहून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या सागर इन्व्हेस्टमेंटच्या समुद्र दाम्प्त्याला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांना शनिवारी कल्याण सत्र न्यायालयात हजर केले असता दोघांनाही ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या सात दिवसांत पोलीस त्यांच्याकडून कोणत्या स्वरूपाची माहिती मिळवतात, यावर या तपासाची दिशा निश्चित होणार आहे.
सागर इन्व्हेस्टमेंटमध्ये बदलापूरसह अनेक शहरांतील गुंतवणूकदारांचे पैसे गुंतलेले आहेत. हा आकडा ४०० कोटींच्या वर आहे. गुंतवणूकदारांची फसवणूक करून ‘सागर’चे प्रमुख सुहास समुद्र आणि सुनीता समुद्र यांनी त्यांचे पैसे देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे संतापलेल्या गुंतवणूकदारांनी त्यांच्याविरोधात आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार करून गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतरही समुद्र दाम्पत्य पोलिसांना तपासात सहकार्य करत होते. मात्र, गुन्हा दाखल होऊनही त्यांना अटक होत नसल्याने गुंतवणूकदारांमध्ये संताप होता. अखेर, ठाण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेने शुक्रवारी रात्री सुनीता समुद्र आणि मध्यरात्री सुहास समुद्र यांना अटक केली. या दोघांनाही न्यायालयात हजर केल्यावर त्यांना ९ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. समुद्र दाम्पत्याला अटक झाल्यावर गुंतवणूकदारांनी न्यायालयात गर्दी केली. याप्रकरणातील आणखी एक आरोपी शोधण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.
- या प्रकरणात नगरसेवक शैलेश वडनेरे हे पोलिसांकडे पाठपुरावा करत आहेत. सुनीता आणि सुहास यांना अटक झाली असली तरी या प्रकरणातील आणखी एक महत्त्वाचा आरोपी श्रीराम समुद्र अद्यापही पोलिसांच्या ताब्यात आला नाही.