ठाण्यात पोलिसांना कोरोनावरील लसीकरण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2021 09:53 PM2021-02-03T21:53:02+5:302021-02-03T21:55:27+5:30
कोणतीही भीती न बाळगता कोरोनावरील लस घ्या. त्याबाबतच्या कोणत्याही अफवांना बळी पडू नका, असे आवाहन ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: कोणतीही भीती न बाळगता कोरोनावरील लस घ्या. त्याबाबतच्या कोणत्याही अफवांना बळी पडू नका, असे आवाहन ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी केले आहे. ठाण्यात आरोग्य सेवेतील ६९ आणि ३० पोलीस अशा फ्रंटलाईनवरील ९९ कर्मचाऱ्यांना बुधवारी ही लस देण्यात आली.
लसीकरणाच्या या कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस आयुक्त फणसळकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी पोलिसांसहठाणेकरांना हा मोलाचा सल्ला त्यांनी दिला. ठाण्यात पोलीस दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांसह ठाणे महापालिकेतील कर्मचाºयांना कोरोना लसीकरण बुधवारपासून सुरू करण्यात आले. ठाणे महापालिकेच्या कळवा आरोग्य केंद्रामध्ये पोलीस आयुक्त फणसळकर यांनी ही पहिली लस घेतली. त्यापाठोपाठ सह पोलीस आयुक्त सुरेश मेकला, अतिरिक्त आयुक्त प्रविण पवार, संजय येनपुरे, परिमंडळ एक ठाण्याचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे, मुख्यालयाचे उपायुक्त गणेश गावडे, दत्ता कांबळे, विशेष शाखेचे उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, मुख्यालयाचे सहायक आयुक्त मंदार धर्माधिकारी आणि कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक-विजय दरेकर आदी ३० अधिकाºयांनी ही लस घेतली.
यावेळी फणसळकर पुढे म्हणाले, ठाणे पोलीस दलाचा प्रमुख या नात्याने आपण ही लस घेतली आहे. कोरोना लसीचे कोणतेही दुष्परिणाम आरोग्यावर होत नाहीत. त्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवता नागरिकांनी या लसीचा लाभ घ्यावा आणि चांगले आरोग्यमय जीवन जगावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. आरोग्य कर्मचाºयांच्या कामाचेही त्यांनी यावेळी कौतुक केले. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात ११ कोविड लस सेंटर उभारले आहेत. अत्यावश्यक सेवेत काम करणाºया कर्मचाºयांना फोन करून त्यांना विविध केंद्रावर लसीकरण केले जात आहे. त्यापैकी बुधवारी कळवा येथील आरोग्य केंद्रावर पोलिसांना लसीकरण सुरू केले आहे. लसीमुळे क्वचित प्रसंगी थोडाफार अशक्तपणा जाणवतो. त्यामुळे घाबरून न जाता आपल्या दिलेल्या केंद्रावर जाऊन लसीकरण करावे, असे आवाहन ठाण्याच्या वैद्यकीय लस केंद्र अधिकारी डॉ. खुशबू टावरी यांनी केले. यावेळी डॉ. श्वेता भायगुडे आणि डॉ. हाला पाटील यांच्यासह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.