पोलिसांना सानेची करायचीय मनोवैज्ञानिक तपासणी; आरोपीच्या कोठडीमध्ये सहा दिवसांची वाढ
By जितेंद्र कालेकर | Published: June 16, 2023 08:03 PM2023-06-16T20:03:40+5:302023-06-16T20:04:00+5:30
हत्या कशी करायची आणि हत्येनंतर पुरावे कसे नष्ट करायचे, याची भायंदर पूर्वच्या मनोज साने याने गूगल सर्च इंजिनवर माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला होता.
ठाणे : हत्या कशी करायची आणि हत्येनंतर पुरावे कसे नष्ट करायचे, याची भायंदर पूर्वच्या मनोज साने याने गूगल सर्च इंजिनवर माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला होता. त्याने क्रूरतेने केलेल्या हत्येमुळे त्याची मनोवैज्ञानिकांकडून तपासणी केली जाणार आहे. तसेच हत्येचा हेतूही स्पष्ट झालेला नसल्यामुळे त्याच्या कोठडीमध्ये वाढ मिळावी, अशी मागणी नयानगर पोलिसांनी केल्यानंतर त्याला २२ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने शुक्रवारी दिले.
गेल्या दहा वर्षांपासून सरस्वती वैद्य (३२) हिच्या बरोबर एकत्रित राहणार्या मनोज (५६) याने तिची भार्इंदर पूर्व भागातील गीता आकाशदीप इमारतीमधील घरात ४ जून रोजी अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी तो सलग चार दिवस तिच्या शरीराचे तुकडे करीत होता. त्याने यातील काही तुकडे कुकरमध्येही शिजवले होते. मनोजचे इतरही काही महिलांबरोबर संबंध असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. त्याचे आणि सरस्वती तसेच इतर महिलांबरोबरचे मोबाईलमधील संभाषण पडताळण्यात येत आहे. त्यासाठी त्याच्या आवाजाचे नमुनेही नयानगर पोलिसांकडून तपासले जाणार आहे. तसेच त्याने क्रूरतेने केलेल्या हत्येमुळे त्याची मनोवैज्ञानिकांकडून तपासणी केली जाणार आहे. तसेच त्याने खून कसा करायचा आणि खून केल्यानंतर पुरावे कसे नष्ट करायचे, याची संपूर्ण माहिती शोधण्याचा प्रयत्न गुगलवर केल्याचीही बाब समोर आली आहे.
या सर्वच बाबींची तपासणी करायची आहे. शिवाय, मनोजने सरस्वीतीचा खून नेमकी कोणत्या कारणामुळे केला, तो हेतूही अद्याप स्पष्ट झालेला नाही. या सर्वच बाबींची सखोल चौकशी करायची असल्यामुळे त्याच्या पोलीस कोठडीत आणखी सहा दिवसांची वाढ करण्याची मागणी विशेष सरकारी अभियोक्ता किरण वेखंडे यांनी केली. आधी आरोपी मनोजला १६ जूनपर्यंत पोलीस कोठडी मिळाली होती. ती शुक्रवारी संपल्यामुळे पोलिसांनी सहा दिवसांच्या वाढीव कोठडीची मागणी दीवाणी न्यायाधीश एम. डी. ननावरे यांच्याकडे केली. दरम्यान, आरोपीचे वकील अतुल सरोज यांनी युक्तीवाद करतांना आधीच पोलीस तपासासाठी आठ दिवसांची कोठडी दिल्याचे निदर्शनास आणले. खूनाचा हा गंभीर आणि क्रूर प्रकार असल्याचे पोलिसांनी आधीही म्हटले होते. तसेच आधीच्या आणि आताच्या कोठडीच्या मागणीची कारणे (रिमांड रिपोर्ट) सारखीच असल्याचेही ॲड. सरोज यांनी सांगितले. न्यायालयाने सर्व बाजू पडताळल्यानंतर आरोपीला २२ जूनपर्यंत पोलीस कोठडी दिली.