आठ पोलिसांच्या हत्याकांडातील विकास दुबेच्या साथीदारांना पोलिसांनी नेले अखेर हवाई प्रवासाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 01:44 AM2020-07-15T01:44:51+5:302020-07-15T01:51:51+5:30
कुख्यात गँगस्टर विकास दुबे याच्या दोन्ही साथीदारांना उत्तरप्रदेश पोलिसांनी अखेर हवाई प्रवासाने लखनौ आणि तिथून वाहनाने कानपूरला मंगळवारी नेले. मुंबई दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अरविंद उर्फ गुड्डन त्रिवेदी आणि त्याचा चालक सोनू त्रिवेदी या दोघांनाही ठाण्यातून अटक केली होती. दोघांच्याही जीवाला धोका असल्यामुळे पोलिसांनी त्यांना हवाईमार्गे नेण्याची मागणी आरोपीच्या वकिलांनी ठाणे न्यायालयात केली होती.
जितेंद्र कालेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: एन्काऊंटर आणि अपघाताची भीती व्यक्त केल्याने हवाई प्रवासाची मागणी केलेल्या कुख्यात गँगस्टर विकास दुबे याच्या दोन्ही साथीदारांना उत्तरप्रदेश पोलिसांनी अखेर हवाई प्रवासाने लखनौ आणि तिथून वाहनाने कानपूरला मंगळवारी नेले.
मुंबई दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अरविंद उर्फ गुड्डन त्रिवेदी आणि त्याचा चालक सोनू त्रिवेदी या दोघांनाही ठाण्यातून अटक केली होती. त्यानंतर त्यांची ट्रान्झिस्ट रिमांड मिळवून दोघांनाही कानपूरला नेल्याची माहिती मुंबई एटीएसने ‘लोकमत’ला दिली.दोघांच्याही जीवाला धोका असल्यामुळे पोलिसांनी त्यांना हवाईमार्गे नेण्याची मागणी आरोपीच्या वकिलांनी ठाणे न्यायालयात केली होती.
विकास दुबे उत्तरप्रदेश पोलिसांबरोबर चकमकीत ठार झाल्यानंतर त्याचे अरविंद आणि सोनू हे दोन साथीदार एन्काऊंटर होण्याच्या भीतीने ठाण्यात पळून आले होते. अरविंद हा विकासचा खास हस्तक मानला जातो. त्याचा चौबेपूर पोलीस ठाण्याच्या आठ पोलिसांच्या हत्याकांडात थेट संबंध असल्याची माहिती सोमवारीच उत्तरप्रदेशच्या (यूपी) पोलिसांनी ठाणे न्यायालयाला दिली. यापूर्वीही त्याच्यावर यूपीमध्ये खूनासारख्या अनेक गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. पोलिसांच्या हत्याकांडानंतर फरार झाल्यानंतर अरविंदची माहिती देणाऱ्यावर तसेच त्याला पकडण्यासाठी युपी पोलिसांनी ५० हजारांचे बक्षिसही जाहीर केले होते, अशी माहिती एटीएसचे पोलीस निरिक्षक दया नायक यांनी दिली. अरविंद हा आपला वाहन चालक सोनू त्रिवेदीसह ठाण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला नायक यांच्या पथकाने शनिवारी अटक केली. या दोघांनाही २१ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी मिळाल्यामुळे त्यांची रवानगी नवी मुंबईतील तळोजा कारागृहात करण्यात आली होती. दरम्यान, या दोघांनाही घेण्यासाठी आलेल्या कानपूर (यूपी) पोलिसांकडे सक्षम व्यवस्था नसल्याचे तसेच अपघातासह एन्काऊंटरची भीतीही त्यांनी ठाणे न्यायालयात व्यक्त केली होती. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही धोका न पत्करता त्यांना हवाईमार्गे घेऊन जाण्याची मागणी आरोपीचे वकील अनिल जाधव यांनी ठाणे न्यायालयाकडे केली होती. आरोपींची ही मागणी मान्य झाल्यामुळे तसेच त्यांना विमानाने नेण्याची तयारी यूपी पोलिसांनी दर्शविल्यामुळे तशी अनुमती सोमवारीच न्यायालयाने दिली. दरम्यान, या दोघांचाही कोरोनाचा अहवाल निगेटीव्ह आल्यामुळे तळोजा कारागृहातून त्यांना मंगळवारी सकाळी बाहेर काढल्यानंतर १४ जुलै रोजी दुपारी १.५५ वा. च्या एका खासगी एअरलाईन्सने त्यांना मुंबईतून लखनौ येथे नेल्याचीही माहिती सूत्रांनी दिली.
असा झाला प्रवास...
कानपूरच्या बकारु गावात ३ जुलै रोजी चौबेपूर पोलीस ठाण्याच्या आठ पोलिसांच्या हत्याकांडानंतर विकास दुबेसह त्याचे साथीदारही पसार झाले होते. अटकेच्या भीतीने अरविंद आणि सोनू हे दोघांनी पलायन केले होते. ते ४ जुलै रोजी पहाटे महाराष्ट्राच्या सीमेवरील दतिया या गावात मित्राच्या घरी थांबले. तिथेच त्यांना विकास दुबेच्या अटकेची माहिती मिळाल्यानंतर तिथून एका टूरिस्ट टॅक्सीने दोघेही दातिया गावातून ५० ते ६० किमीपर्यंत ५ जुलै रोजी आले. नंतर नाशिकमार्गे ते पुण्यात आले. पुण्यातच मुक्काम करुन त्यांनी दुस-या दिवशी एका भाजीच्या टेम्पोने ६ जुलै रोजी ठाणे गाठल्याची माहिती सूत्रांनी दिली.