१ हजार १११ प्रकरणात कौटुंबिक समझोता घडवून आणण्यात पोलिसांच्या भरोसा सेलला यश
By धीरज परब | Published: October 8, 2023 02:18 PM2023-10-08T14:18:01+5:302023-10-08T14:18:16+5:30
भरोसा सेलचा दुसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा
मीरारोड - मीरा भाईंदर मधील पोलिसांच्या भरोसा सेल ने गेली दोन वर्षात १ हजार १११ कौटुंबिक व अन्य प्रकरणात यशस्वी समझोता घडवून आणण्यात यश मिळवले आहे . विशेषतः पती - पत्नी तसेच कुटुंबातील वाद दूर करून त्यांचे संसार फुलवणाऱ्या भरोसा सेलचा दुसरा वर्षापन दिवस सुद्धा मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला गेला.
ठाणे ग्रामीण पोलीस असतात तत्कालीन सहायक अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी पुढाकार घेऊन भाईंदर पोलीस ठाण्याच्या गच्चीवर भरोसा सेल कार्यान्वित केला होता . अल्पवधीतच भरोसा सेलने लोकांचा भरोसा जिंकला . कुलकर्णी यांच्या बदली नंतर मात्र भरोसा सेल काहीसा दुर्लक्षित झाला.
मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालय अस्तित्वात आल्या नंतर तत्कालीन पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी आयुक्तालयाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून १ ऑक्टोबर २०२१ रोजी भरोसा सेल पुन्हा सुरु केला . त्याची धुरा दाते यांनी महिला सहायक निरीक्षक तेजश्री शिंदे यांच्या हाती दिली . शिंदे यांनी देखील दिलेली जबाबदारी सार्थ ठरवत अनेकांचे संसार जोडण्याचे कार्य चालवले आहे.
महिला, बालके व जेष्ठ नागरिक यांच्या समस्या एकाच छताखाली सोडवण्याचे काम भरोसा सेल करत आहे . गेल्या २ वर्षात भरोसा सेल मध्ये एकुण १८४१ तक्रारी अर्ज प्रकरणे आली . त्यापैकी १ हजार १११ प्रकरणांचे निराकरण करून अनेक कुटुंबात समझोता घडवुन आणण्यात आला आहे. समझोत्याचे प्रमाण हे जवळपास ६१ टक्के इतके असून ते आणखी वाढवण्यासाठी भरोसा सेल प्रयत्नशील आहे . या शिवाय परदेशात कौटुंबिक हिंसाचारास बळी पडलेल्या पिडीत महिलेस, कामानिमित्त परदेशात जाऊन अडकलेल्या ४ जणांना भारतीय दुतावासाच्या मदतीने सुखरुप भारतात आणण्यात भरोसा सेल ला यश मिळाले आहे.
भरोसा सेलच्या वर्धापन दिना निमित्त आयोजित कार्यक्रमात गुन्हे शाखेच पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे, सहायक पोलीस आयुक्त अमोल मांडवे, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेचे पोलीस निरीक्षक समीर अहिरराव, भरोसा सेलच्या प्रभारी सहायक निरीक्षक तेजश्री शिंदे सह पोलीस ठाण्यातील बालकल्याण अधिकारी, महिला दक्षता समिती सदस्य, भरोसा सेलचे अधिकारी व कर्मचारी , भरोसा सेल मधून पुन्हा जुळलेली कुटुंब तसेच भरोसा सेल मध्ये विनामूल्य सेवा देणारे समुपदेशक आदी उपस्थित होते. यावेळी केक कापून व उपस्थितांना मार्गदर्शन करून तर काहींनी स्वतःचे अनुभव कथन करून भरोसा सेलचा वर्धापन दिन आनंदात व उत्साहात साजरा केला . यावेळी उपायुक्त अंबुरे यांच्या हस्ते भरोसा सेल मध्ये येणाऱ्यांचे समुपदेशन करणारे वकील, डॉक्टर, समाजसेवक, एनजीओ सदस्य आदींचे सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव केला. भरोसा सेलच्या कार्याचे यावेळी अंबुरे यांनी कौतुक केले.