दहीहांडी उत्सवावर पोलीसांचा वॉच; ३ हजाराहून अधिक पोलीस बंदोबस्तावर
By अजित मांडके | Published: September 6, 2023 03:42 PM2023-09-06T15:42:56+5:302023-09-06T15:45:11+5:30
ठाण्यासह कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आदीसह इतर ठिकाणी गुरुवारी दहीहांडीची धुम असणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाण्यासह जिल्ह्यच्या विविध भागात दहीहांडी धुम होणार असल्याने यावेळी कोणताही अनुचीत प्रकार घडू नये या उद्देशाने ठाणे पोलीस सर्तक झाले आहे. त्या अनुषंगाने मानाच्या हंडीसह इतर हंडीच्या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार आहे. यासाठी ३ हजाराहून अधिक पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार आहे. तसेच ४ एसआरपीएफच्या कंपनी आणि ४०० होमगार्डही त्यासाठी सज्ज ठेवण्यात आले आहेत.
ठाण्यासह कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आदीसह इतर ठिकाणी गुरुवारी दहीहांडीची धुम असणार आहे. मागील काही वर्षात या उत्सवाला वेगळे स्वरुप प्राप्त झाल्याने त्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेले असते. प्रत्येक मानाच्या हंडीच्या ठिकाणी थरावर थर लावले जात असतात.
त्यामुळे या हंडी फोडण्यासाठी ठाण्यासह जिल्ह्यातून आणि मुंबई व इतर परिसरातून शेकडो गोंविदा पथके ठाण्यात येत असतात. तसेच या हंडी पाहण्यासाठी ठाणेकर नागरीक देखील रस्त्यावर उतरत असतात. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुक कोंडीही होत असते. त्यामुळे वाहतुक कोंडी सोडविण्याबरोबरच या उत्सवाला गालबोट लागू नये, छेडछाडीचे प्रकार या निमित्ताने होऊ नयेत, तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये या उद्देशाने ठाणे पोलीस सज्ज झाले आहेत. पोलीस आयुक्तालयात परिमंडळ निहाय पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
त्यानुसार यात ५ अप्पर पोलीस आयुक्त, १० पोलीस उप आयुक्त, १५ सह पोलीस आयुक्त, ९६ पोलीस निरिक्षक, २८८ सहाय्यक पोलीस निरिक्षक आणि पोलीस उपनिरिक्षक २८८, पोलीस अंमलदार २३३२, अंमलदार ५३६ आणि एसआरपीएफच्या ४ कंपन्यासह ४०० होमगार्ड आदींचा यात समावेश आहे. एकूण बंदोबस्ताबरोबर त्यात अतिरिक्त पोलीस बंदोबस्तही वाढविण्यात आला आहे. तसेच मुंबई कडून २ एसआरपीएफच्या तुकड्या मागविण्यात आल्या आहेत.