फुगे किंवा पाण्याच्या पिशव्या फेकणाऱ्यांवर पोलिसांचा 'वॉच'; पकडल्यास खैर नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 04:31 PM2022-03-17T16:31:44+5:302022-03-17T16:32:29+5:30
कोरोनाचे निर्बध शिथिल असले तरी नागरिकांनी सुरक्षित अंतर ठेवून, मास्क परिधान करून होलिकोत्सव साजरा करावा
ठाणे: विनापरवानगी कोणीही एखाद्यावर पाण्याचे फुगे किंवा प्लास्टिक पिशव्या फेकून मारल्यास संबंधितांविरुद्ध प्रसंगी गुन्हे दाखल केले जाणार आहेत. कोरोनाचे नियम शिथिल असले तरीही नागरिकांनी गर्दी न करता उत्साहाने होळी आणि धुळवडीचा सण साजरा करण्याचे आवाहन ठाणे पोलिसांनी केले आहे.
ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या पाचही परिमंडळांमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी राज्य राखीव दलासह पोलिसांची जादा कुमक तैनात केली आहे. भिवंडी, मुंब्रा, राबोडीसह शहरातील संवेदनशील भागांमध्ये दंगल नियंत्रण पथके, राज्य राखीव दलाच्या चार कंपन्या तसेच पोलीस मुख्यालयातील राखीव पोलीस कर्मचाऱ्यांची कुमक धार्मिक स्थळांसह महत्वाच्या ठिकाणी नेमल्याची माहिती सूत्रांनी दिली. कोरोनाचे निर्बध शिथिल असले तरी नागरिकांनी सुरक्षित अंतर ठेवून, मास्क परिधान करून होलिकोत्सव साजरा करावा, डीजे वाजविण्यालाही बंदी असून विनाकारण कोणीही एखाद्या मुलीवर किंवा मुलावर फुगे फेकत असल्याचे आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस उपायुक्त डॉ. विनय राठोड यांनी सांगितले. तशी तक्रार आली तर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. पोलिसांच्या गस्ती पथकांद्वारे अशा टवाळखोर समाजकंटकांवर करडी नजर ठेवली जाणार आहे. गुरुवारी होळीच्या दिवशी तसेच शुक्रवारी दिवसभर मोक्याच्या ठिकाणी नाकाबंदी करून अचानक तपासणीही केली जाणार आहे. तसेच मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध ठाणे आयुक्तालयातील १८ युनिटच्या पथकांकडून कारवाई केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
निर्बंध नसले तरी होळीनिमित्त गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे. कोणीही प्लास्टिकच्या पिशव्या किंवा पाण्याचे फुगे मारू नयेत. संबंधितांवर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. होळी आणि धुळवडीसाठी नाकाबंदी आणि बंदोबस्तही ठेवला आहे. - डॉ. सुरेशकुमार मेकला, सह पोलीस आयुक्त, ठाणे शहर